Friday, May 3, 2024
Homeनाशिकवादळीवार्‍यांसह गारांच्या वर्षावाने पिकांची हानी

वादळीवार्‍यांसह गारांच्या वर्षावाने पिकांची हानी

मालेगाव । प्रतिनिधी

माळमाथा भागातील कळवाडी परिसरात वादळीवार्‍यांसह गारांचा वर्षावात झालेल्या बेमोसमी पावसाने डाळिंब, द्राक्ष बागांसह पिकांची अतोनात हानी झाली आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात येवून हेक्टरी 50 हजाराची मदत आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने तात्काळ करावी, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य लकी गिल यांनी केली आहे.

- Advertisement -

मालेगाव-चाळीसगाव शिवारातील कळवाडीसह दहिवाळ, उंबरदे, चिंचगव्हाण, नरडाणे या गाव शिवारातील पिकांसह फळबागा गारपीटीने उद्ध्वस्त झाल्या आहेत. गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदा आदी पिकांना देखील मोठा फटाका बसल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

चिंचगव्हाण परिसरात वादळी वार्‍यासह गारांचा अक्षरश: वर्षाव झाल्याने पिक झोडपली गेली. गहू, हरभरा, कांदा आदी पिके पूर्णत: जमीनदोस्त झाल्याने शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत. गारांमुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. त्यामुळे पाणी असले तरी पुढील पिकांच्या उत्पादनात ही घट होईल. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

या अस्मानी संकटात राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे. सर्वप्रथम युद्ध पातळीवर पंचनामे करावेत. त्याचा अहवाल तत्काळ जिल्हा प्रशासनाला पाठवून शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये भरपाई द्यावी, तसेच नुकसानग्रस्त भागात सक्तीची वीजबिल वसुली रोखावी, कर्जवसुलीलाही स्थगिती द्यावी, अशी ही मागणी लकी गील यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या