राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर दारणा, भावली, भाम या धरणांच्या पाणलोटात काल जोरदार पाऊस झाला. काल 24 तासांत भावलीत 100 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. हे धरण 32.5 टक्क्यांच्या पुढे सरकले आहे. खाली नांदूर मधमेश्वर बंधार्याच्या पाणलोटात पाऊस झाल्याने या बंधार्यात पाण्याची आवक झाल्याने या बंधार्यातून काल सकाळी 10 वाजता सुरुवातीला 300 क्युसेकने पाणी गोदावरीत सोडण्यात आले. सायंकाळी 6 वाजता 1614 क्युसेक करण्यात आले. त्यामुळे गोदावरी वाहती झाली आहे.
काल दारणा धरणाच्या पाणलोटात दिवसभरातील 12 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 59 मिमी पावसाची नोंद झाली. भाम धरणाच्या भिंतीजवळ 79 मिमी तर भावलीला 82 मिमी पावसाची नोंद झाली. मुकणेला 45, वाकीला 45 तर वालदेवीला 37 मिमी पावसाची नोंद झाली.
दरम्यान काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत भावलीला 187 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे भावलीत 24 तासांत 100 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. हे धरण 32.5 टक्क्यांचा पुढे सरकले आहे. काल सकाळी संपलेल्या 6 वाजता मागील 24 तासांत दारणा धरणाच्या 12 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. काल दिवसभरात दारणा धरणाच्या पाणलोटात पावसाचे जोरदार आगमन होत होते. यामुळे पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. काल दारणा 7.18 टक्क्यांवर होते. मुकणे 19.96 टक्के, वाकी 5.66 टक्के, भाम 6.29 टक्के, भावली 32.50 टक्के, वालदेवी 36.19 टक्के.
गंगापूर 33.48 टक्के, कश्यपी 48.02 टक्के, गौतमी गोदावरी 78.59 टक्के, कडवा 16.88 टक्के, आळंदी 5.27 टक्के असा पाणी साठा आहे. गौतमी गोदावरीतून 580 क्युसेक ने विसर्ग सुरू झाला आहे. खाली नांदूर मधमेश्वर बंधार्याच्या पाणलोटातील सायखेडा, चांदोरी भागात झालेल्या जोरदार पावसाने या बंधार्यात पाण्याची आवक झाली. त्यामुळे गोदावरीत या बंधार्यातून 1614 क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाच्या पाण्यामुळे गोदावरी वाहती झाली आहे.
जायकवाडीत 28 टक्के साठा
6 जुलै रोजी जायकवाडी धरणात 21.5 टीएमसी म्हणजे 28 टक्के जिवंत पाणीसाठा असून पैकी 0.50 टिएमसी पाण्याची 1 जुन पासुन 0.50 टीएमसी नव्याने आवक झाली आहे. मेंढेगिरी अहवालानुसार जायकवाडी धरणात 15 आक्टोबरला खरीप वापरासह 50 टीएमसी म्हणजे जिवंत साठ्याच्या 65 टक्के पाणीसाठा असेल तर अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील धरणातून समन्यायीनुसार पाणी सोडण्याची आवश्यकता नसते. नव्याने सादर केलेल्या मांदाडे अहवालानुसार ही टक्केवारी 65 वरुन 58 टक्के झाली आहे. परंतु शासनाने अद्याप त्याबाबत कुठलेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. यावर्षी एल-निनोमुळे जायकवाडीच्या मुक्त पाणलोटक्षेत्रात सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याने समन्यायीनुसार जायकवाडीसाठी पाणी सोडले जाण्याची दाट शक्यता आहे.




