कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्याची योजना साकारण्याचे काम येड्यागबाळ्याचे नाही. त्यासाठी मोठा निधी लागतो. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. पुढील साडेचार वर्षे तेच पंतप्रधान राहणार आहेत. त्यांच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात आल्यास निधी मिळू शकतो. त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. कोपरगावकरांनी तरुण, उच्चशिक्षित व व्हिजन असलेला आमदार आशुतोष यांच्या रूपाने दिला, असे कौतुक केल्यानंतर ना.अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी टीका विरोधक करतात. ही योजना बंद करण्यासाठी विरोधक न्यायालयातही गेले. लाडकी बहीण योजना सुरू केल्याने महिला आनंदी आहेत. योजना सुरू ठेवण्यासाठी महायुती सरकारला पुन्हा निवडून द्या. पाच वर्षे ही योजना कोणी मायचा लाल बंद करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.