Thursday, May 9, 2024
Homeजळगावप्रशासनाची अनास्था ; सात्री येथे महिलेचा मृत्यू

प्रशासनाची अनास्था ; सात्री येथे महिलेचा मृत्यू

बाबूलाल पाटील

अमळनेर प्रतिनिधी- amalner

- Advertisement -

सात्री गावाला स्वातंत्र्यपूर्वीपासून जायला रस्ता नाही, बोरी नदीवर (Bori River) पूल नाही, गावचे पुनर्वसन झाल्यामुळे आजपर्यंत गावाचा विकास आराखडा कोलमडून पडला आहे.

तालुका, जिल्हा प्रशासनाने सात्री पुनर्वसनाची आवश्यक निधीची तरतूद करून तांत्रिक अडचणी लवचिक करून रस्त्याचा मार्ग त्वरित काढावा. आणखी किती बळी जाण्याचा प्रशासन वाट पाहत आहे?

– महेंद्र बोरसे, माजी सरपंच, सात्री ता. अमळनेर

विकासाचे योग्य नियोजन प्रशासनाने न केल्यामुळे नागरिकांना वारंवार वेगवेगळ्या घटनांना तोंड द्यावे लागले आहे. प्रशासनाच्या रावणरूपी प्रवृत्तीमुळे तालुक्यातील सात्री ग्रामस्थांची पिडा काही सुटायला तयार नाही. या रावणरूपी वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी आज बुधवारी दसरा सण साजरा होत असतानाच सात्री येथील वृद्ध महिला उषाबाई रामलाल भिल्ल (वय ५३) यांना प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली.

आज त्यांच्यासाठी उषःकाल होता होता काळ रात्र झाल्याने ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. सात्री येथे वर्षभरात दुसरा बळी गेल्याने प्रशासन अजून किती जणांचा बळी घेईल? असा संतप्त सवालही ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

तालुक्यातील सात्री येथील उषाबाईला दसऱ्याच्या पहाटे साडे तीन वाजता छातीत कळा येऊ लागल्या आणि उलट्याही झाल्या. पण अंधार असल्याने त्यांना नदीतून कसे घेऊन जावे म्हणून कुटुंबाने आणि शेजाऱ्यांनी उजाडण्याची वाट पाहिली. सकाळी ही दवाखाण्यात नेण्यासाठी नदी पार करायची होती. बैलगाडी पाण्यातून जाऊ शकत नव्हती. गावातील चार पाच लोकांना बोलावले, पारंपरिक पद्धतीने झोळी तयार करून उषाबाईला झोळीत बसवून चार ते पाच जणांनी नदी पार केली. तोपर्यंत बराच कालावधी उलटला होता. अशा परिस्थितीत ही त्यांना अमळनेरला आणले.

प्रकृती अत्यवस्थ म्हणून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. अखेर डॉक्टरांनी तिला मृत ‘घोषित केले आणि कुटुंबाचा अश्रूंचा बांध फुटला. तर मृत तिला दवाखान्यात आणणाऱ्या ग्रामस्थांचा संताप अनावर झाला.

येरे माझ्या मागल्या प्रमाणे सात्री गावाला स्वातंत्र्यपूर्वीपासून जायला रस्ता नाही, बोरी नदीवर पूल नाही, गावचे पुनर्वसन झाल्यामुळे शासन विकास करत नाही, पुनर्वसित गावचे काम होत नाही. अनेक आंदोलने, अनेक समस्या उद्भऊन देखील प्रशासन फक्त बैठक आणि तांत्रिक अडचणी दाखवून सात्री ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसत आहेत.

गेल्या वर्षी आरुषीचा गेला होता बळी

गेल्या वर्षी आरुषी नावाची ११ वर्षीय आदिवासी बालिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. तरीही निष्ठुर प्रशासनाला जाग आली नाही. वर्षभर काहीही उपाय योजना केली नाही. त्यामुळेच वृद्ध महिलेचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

समन्वय अभावी बोट ठरली शोभेची बाहुली

प्रशासन म्हणते १७ किमी वर अमळनेरला बोट नगरपालिकेत आणून ठेवली आहे. मात्र ग्रामपंचायतीला प्रशासनाने बोट उपलब्ध असल्याचे कळवलेले नाही. १७ किमी वरून बोट आणि कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी किमान तास दीड तासच्या वर कालावधी लागतो. प्रशासनाने आणखी एक बळी घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या