बोलठाण | प्रतिनिधी
भरधाव ट्रक (हायवा) व दुचाकीच्या अपघातात बाप-लेक ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.3) ऑक्टोबर रोजी शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या लाडगाव रस्त्यावर (रोठी परिसर) घडली. अय्युब मुनीर शहा (46) व अश्मीरा अय्युब शहा (12) असे अपघातात ठार झालेल्या बाप-लेकीचे नाव आहे. तर अंजुम अय्युब शहा (35) ( सर्व रा. बोलठाण, ता. नांदगाव) असे या अपघात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्युब शहा हे बोलठाण येथील रहिवासी होते. शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास ते पत्नी अंजुम व त्यांची मुलगी अश्मिरा हे लाडगाव रस्त्याने दुचाकीवर प्रवास करत होते. दरम्यान रोठी परिसरात त्यांची दुचाकी भरधाव हायवाच्या चाकाखाली येऊन अय्युब शहा हे चाकाखाली चिरडले गेले. ते जागीच ठार झाले, तर मुलगी अश्मिरा ही गंभीर जखमी झाली. याशिवाय त्यांच्या पत्नीही जखमी झाल्या.
घटना घडताच अश्मिरा व अंजुम यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी जात असताना रस्त्यातच अश्मिरा हिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून घटनेतील हायवा पोलिसांनी जप्त केला आहे.
मैत्रीचा राजा म्हणून ओळख
या दुर्घटनेमुळे बोलठाण गावावर शोककळा पसरली आहे. अय्युब शहा यांची ओळख म्हणजे मैत्रिचा राजा म्हणून गावात होती. आठवडी बाजारात मसाले विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. विशेष म्हणजे सात दिवसातील सहा दिवस परिसरातील वेगवेगळे बाजार करायचे. अडलेल्या माणसाला कधीही अडवू नका, असे ते गावात प्रत्येकाला सांगत. त्यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.




