नाशिक। प्रतिनिधी Nashik
उसाचा रस पिण्यासाठी सहशिक्षकांसह रस्त्यावरील रसवंतीजवळ उभ्या असलेल्या शिक्षिकेस भरधाव फाॅर्च्युनर कारने जाेरदार धडक दिल्याने रविवारी(दि. १६) दुपारी दाेन वाजता झालेल्या भीषण अपघातात ३८ वर्षीय शिक्षिका ठार झाली. हिट अन्ड रनच्या या गुन्ह्यात कार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून मुंबई नाका पाेलिसांत फेटल अपघाताची नाेंद करण्यात आली आहे. गायत्री संदीप ठाकूर(रा. अनुश्री अपार्टमेंट, इंदिरानगर, नाशिक) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. तर अपघातात एक पुरुष आणि एक महिला जखमी झाल्याचे कळते.
गायत्री या मनोहर गार्डन शेजारी असलेल्या एका रसवंतीच्या गाड्यावर सहकारी शिक्षकांसोबत उसाचा रस पिण्यासाठी थांबल्या होत्या. त्याच वेळी इंदिरानगर बोगद्याकडून सीटीसेंटर माँलकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील (एमएच १४ जेई ०९००)या फोर्च्युनर कारने फूड ऑन व्हिल रिक्षा, रसवंती आणि रस्त्यालगतच्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गायत्री या बाजूला फेकल्या गेल्या. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने गायत्री ठाकूर आणि अन्य दोन जखमींना गोविंदनगर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डाॅक्टरांनी गायत्री यांना तपासून मृत घाेषित केले.
गायत्री या रचना विद्यालयात कार्यरत हाेत्या, असे समजते असून त्यांच्या पश्चात पती आणि दोन लहानग्या मुली आहेत. या अपघाताला कारणीभूत ठरलेला चालक सौरभ भोपे यांस मुंबईनाका पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. इंदिरानगर बाेगद्यातील वाहतूक काेंडीने सर्वच त्रस्त आहेत. त्यातच बाेगदा ते सीटी सेंटरपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा विविध दुकाने, हातगाडी लागतात. त्यामुळे अतिक्रमण वाढले असून याच विळख्याने रस्ता काबीज केला जात आहे. येथील अतिक्रमण तत्काळ हटविणे गरजेचे असल्याचे वाहनधारकांनी सांगितले.