Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारमहिलादिन विशेष : लग्नात पहिली पंगत महिलांची बसविण्याचा निर्णय

महिलादिन विशेष : लग्नात पहिली पंगत महिलांची बसविण्याचा निर्णय

सारंगखेडा येथे महिला दिनी झाली अंमलबजावणी : गुर्जर समाजाचा निर्णय

शहादा

सधन शेतकरी म्हणून परिसरात ओळख असलेल्या गुर्जर समाजाने परंपरेला फाटा देत महिला दिनाचे औचित्य साधून एका विवाह समारंभानंतरच्या पंक्तीत महिलांना प्रथम स्थान देत नवा पायंडा पाडला आहे. समाजाध्यक्ष दीपक पाटील यांच्या उपस्थितीत सारगंखेडा ता. शहादा येथे झालेल्या विवाह समारंभप्रसंगी घेण्यात आलेल्या या आदर्श निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

- Advertisement -

गुजरात, मध्यप्रदेश राज्यासह महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील मुख्यत: शहादा व नंदुरबार तालुक्यात वास्तव्यास असलेल्या गुर्जर समाजाने रूढी परंपरांना फाटा देत अनेक बदलांचा स्वीकार केला आहे. समाजाच्या अखिल भारतीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळत सबंध हयातभर गुर्जर समाजासोबतच अन्य सर्वच समाजाच्या विकासासाठी अहर्निश झटणार्‍या स्व. पी.केअण्णा पाटील यांच्यानंतर समाजाला सामुहिक बैठकीद्वारे योग्य दिशा देण्याचे कार्य दीपक पाटील करीत आहेत. श्री. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सारंगखेडा ता.शहादा येथील विवाह समारंभात महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या भोजनाची प्रथम पंगत बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहादा व नंदुरबार तालुक्यासह सीमावर्ती गुजरात व मध्यप्रदेशात गुर्जर समाजाची बहुसंख्य वस्ती आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असणार्‍या गुर्जर समाजाला स्व. पी.के. अण्णांच्या माध्यमातून सुमारे सहा दशकांपूर्वी सुधारणावादी नेतृत्व लाभले.ऊस, कापूस आदी नगदी पीक घेणार्‍या गुर्जर समाजाची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याने हा समाज सधन म्हणून गणला गेला. आर्थिक भरभराट होत असतांना समाजाला सामाजिक बंधने घालून योग्य मार्ग दाखवण्याचे काम पी. के अण्णांनी केल्याने अनेक अनिष्ट रूढी परंपरांचा त्याग सामाजिक बैठकीत करण्यात आला.

विवाह समारंभ असो की सार्वजनिक उपक्रम गुर्जर समाजाचा कार्यक्रम आदर्श व अनुकरणीय म्हणून अन्य समाजासमोर सातत्याने उभा राहिला आहे. विवाह समारंभातील अनावश्यक खर्चाला फाटा देण्यासह विवाह वेळेवर लावणे, पंगतीचा खर्च कमी करणे, हूंडा प्रथा बंद करणे आदी सामाजिक हिताचे निर्णय घेणार्‍या गुर्जर समाजाने दु:खद प्रसंगातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सर्व संमतीने मान्यता दिलेली आहे. या समाजाने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून अन्य समाजासमोर मोठा आदर्श उभा केला आहे. त्यातून अनेक सामाजिक हिताच्या सुधारणा केल्याने समाजाच्या आदर्श मूल्यांची सर्वदूर ओळख झाली.

सामूहिक कार्यक्रम वेळेवर सुरू करण्यासह योग्य नवीन बदलांचा स्वीकार करण्याचे तत्त्व व सूत्र अंगीकारणार्‍या गुर्जर समाजाने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना पंगतीत प्रथम स्थान देऊन नवा पायंडा पाडला आहे. सारंगखेडा ता.शहादा येथील येथील ब्रिजलाल मदन पाटील यांची नात व रवींद्र ब्रिजलाल पाटील यांची सुकन्या चि. सौ. कां.मयुरी आणि बोराळा येथील अंबालाल छगन पाटील यांचे चि.अंकुर यांच्या विवाह सोहळ्यानंतर महिलांची पहिली पंगत बसवण्याच्या ऐतिहासिक निर्णय समाजाचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष दीपक पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.सातत्याने नवीन बदलाचा स्वीकार करत अनिष्ट रूढी परंपरांचा त्याग करणार्‍या गुर्जर समाजाच्या महिला सन्मानाच्या सारंगखेडा गुर्जर समाज व ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या