Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याअतिपावसामुळे मका, सोयाबीनच्या उत्पादनात घट

अतिपावसामुळे मका, सोयाबीनच्या उत्पादनात घट

निफाड | Niphad

यावर्षी प्रारंभीपासून ते अखेरपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने मका, सोयाबीन, भाजीपाला, टोमॅटो आदी पिके वाया जावून उत्पादनात मोठी घट झाली आहे.

- Advertisement -

वाढती मागणी व घटती आवक यामुळे बाजारभाव वाढले असले तरी हातात आलेले उत्पादन बघता उत्पादनातून मिळणार्‍या पैशांची तोंडमिळवणी होतांना दिसत आहे.

यावर्षी प्रारंभीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी मका, सोयाबीन, भुईमुंग, कांदा रोपे टाकणे आदी पिकांची लागवड केली होती. मात्र प्रारंभी सुरू झालेला पाऊस सतत तीन महिने बरसत राहिल्याने शेतात पाणी साचले. परिणामी अतिपावसामुळे शेतात उभी असलेली पीके सडली.

अतिपावसामुळे ऊस आडवा पडला, लाल कांदा बियाणे वाया गेले असून भाजीपाल्याची तीच अवस्था झाली. निफाड तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर द्राक्षबागा उभ्या आहेत. मात्र या पावसाचा द्राक्षबागांना देखील मोठा फटका बसला आहे.

सद्यस्थितीत सप्टेबर महिन्यापासून द्राक्षबागा छाटणीची कामे सुरू आहेत. ज्या बागा सप्टेबर महिन्यात छाटल्या त्या पोग्यात असून अनेक बागांची डिपिंगची कामे सुरू आहेत तर अनेक शेतकर्‍यांनी आता ऑक्टोबर छाटणीस सुरुवात केली आहे.

द्राक्षबागांबरोबरच टोमॅटो हंगाम देखील ऐन बहरात आला आहे. प्रारंभीची टोमॅटो रोपे वाया गेल्याने शेतकर्‍यांनी रोपवाटिकेतून रोपे आणून पुन्हा टोमॅटो लागवड केली. मात्र ढगाळ हवामान, पाऊस यामुळे यावर्षी टोमॅटो पीक पाहिजे त्या प्रमाणात आले नाही.

सद्यस्थितीत टोमॅटोस मोठी मागणी असल्याने भाव वाढले असले तरी देखील त्या प्रमाणात टोमॅटो निघत नसल्याने शेतकर्‍यांची पंचाईत झाली आहे तर आता टोमॅटो पीक व द्राक्षबागा वाचविण्यासाठी मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात शेतात राबतांना दिसत आहे.

टोमॅटो व द्राक्ष हंगामासाठी पेठ, सुरगाणा, सापुतारा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातून मजूर मोठ्या प्रमाणात तालुक्यात दाखल झाले आहे. कारण द्राक्षबाग छाटणीनंतर पेस्ट करणे, डिपिंग, थिनिंग, पावडर मारणे, पोषके देणे, दुसरी-तिसरी डिपिंग, घड बांधणी आदी कामांसाठी मजूरांची गरज भासते. स्थानिक मजूरांपेक्षा बाहेरील तालुक्यातील मजूर शेतात राहत असल्याने वेळचेवेळी कामे होत आहे.

द्राक्षबागांप्रमाणेच अगदी काही दिवसातच उन्हाळ कांदा लागवडीचा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र शेतीमशागतीची सर्व कामे आता रोजंदारीऐवजी टेंडर पद्धतीने होत असल्याने या मजूरांचे टोळके प्रत्येक गावात दिसू लागले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या