Thursday, May 2, 2024
Homeनाशिकसेनेच्या चार जणांचेे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

सेनेच्या चार जणांचेे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील सोळा सदस्य निवडीची बुधवारी (दि.24) झालेल्या विशेष महासभेत झालेली निवड प्रक्रिया बेकायदेशिर असल्याचा आरोप सेनेने केल्यानंतर सत्ताधार्‍यांच्या विरोधात काँग्रेसने न्यायालयात जाण्याची तयारी केली असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थायी सदस्य निवडीचा ठराव विखंडणासाठी शासनाकडे पाठविण्याची मागणी केली आहे. दरम्यान स्थायीवरुन वाढलेल्या वादानंतर भाजप गटनेते जगदिश पाटील यांनी या निवडणूक प्रक्रियेत शासन नियम न पाळल्याने शिवसेना गटनेत्यांनी सुचविलेली सदस्यांची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिकेचे आर्थिक केंद्र असलेली स्थायी समितीवर भाजपचा सभापती रहावा म्हणुन स्थायी समिती सदस्य निवडीसंदर्भात झालेल्या विशेष महासभेत भाजपने आपले आठही नवीन सदस्य देतांनाच इतर पक्षांचे सर्वच्या सर्व अशा सोळा सदस्यांची नवीन नियुक्ती केल्यामुळे विरोधकांत मोठा संताप व्यक्त केला जात आहे. ही प्रक्रिया महापालिकेच्या वकीलांच्या अभिप्रायानंतर केल्याचा दावा सत्ताधारी भाजपने कला आहे. ही निवड प्रक्रिया राबवितांना 2 वर्षाची मुदत न संपलेल्या भाजपच्या चार सदस्यांचे राजीनामे नगरसचिवांकडे न पाठविताच निवड प्रक्रिया राबविल्याच्या मुद्द्यावरुन सुधाकर बडगुजर यांनी ही निवड बेकायदेशिर असल्याचा आरोप करीत या ठरावावर अंमलबजावणी करु नये अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी वादात उडी

आज कॉग्रेस पक्षांचे गटनेते शाहु खैरे यांनी निवड प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली असून आज त्यांनी नगरसचिवांना पत्र देऊन स्थायी सदस्य राहुल दिवे, समिना मेमन, सुधाकर बडगुजर व सत्यभामा गाडेकर यांच्या नियुक्ती नवीन आहे किंवा जुनी आहे, यासंदर्भात लेखी खुलासा मागितला आहे. तसेच सभा क्रमांक 13 विषय क्रमांक 621 ठराव क्र्रमांक 621 नुसार ठराव झालेला दिसत असून या ठरावामध्ये 11 नवीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे असे म्हटले आहे. जर 9 सदस्यांच्या निवडीचा अजेंडा काढला होता तर 11 सदस्यांची नेमणूक कुठल्या कायद्यान्वे केली याचा खुलासा करण्याची मागणीही खैरे यांनी पत्रातून केली आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे गटनेते गजानन शेलार यांनी आयुक्तांना आज पत्र देऊन स्थायी सदस्यांची बुधवारी झालेली निवड बेकायदेशीर असून हा ठराव विखंडीत करण्यासाठी नगरविकास विभागाकडे पाठवावा अशी मागणी केली आहे. स्थायीतील सर्व सदस्यांची नवीन रचना करण्यासंदर्भात माहिती सर्व गटनेत्यांना देण्यात आलेली नाही, अजेंड्या व्यतिरीक्त सदस्यांची निवड ही चुकीच्या पध्दतीने झाली असल्याचा आरोप करीत शेलार म्हणाले, महापालिकेत भाजपकडुन गँगवॉर सुरू झाले असून मनपात लुटमार कमेटी स्थापन झाली आहे. भाजपने पक्षांच्या कट्टर लोकांना बेईमान ठरविण्याचे काम केले असुन विश्वासातील माणसे टाकण्याचे काम केले आहे. अशाप्रकारे बेकायदेशिर काम करणार्‍या भाजपला येणार्‍या निवडणुकीत नाशिककर जागा दाखवतील , असेही शेलार यांनी सांगितले.

सेनेची नावे 2 पत्राद्वारे आली : नगरसचिव

24 फेब्रुवारी रोजी स्थायी सदस्य निवडीसाठी झालेल्या विशेष महासभेत शिवसेनेच्या नवीन सदस्यांची नावे शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी स्वत: महापौर यांच्याकडे सादर न करता त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी सचिन बोरसे यांच्यामार्फत महापौरांकडे महासभेचे कामकाज सुरु होण्यापुर्वी बंद पाकीटाऐवजी 2 खुल्या पत्राद्वारे सादर केले, असे स्पष्टीकरण नगरसचिव विभागाकडुन महापौरांनी दिलेल्या पत्राच्या उत्तरादाखल दिले आहे.

त्या सदस्यांची निवड रद्द करा : पाटील

मनपाच्या बुधवारी (दि.24) रोजी स्थायी सदस्य निवडीसाठी झालेल्या महासभेत शिवसेनेच्या गटनेत्याकडुन बेकायदेशिर पद्दतीचा अवलबं करण्यात आला असून शासनाच्या सुचनांचे पालन झालेले नसल्याचा आरोप भाजप गटनेते जगदिश पाटील यांनी करीत आयुक्तांना आज पत्र दिले आहे. सदस्यांची नावे सेना गटनेता किंवा विरोधी पक्षनेता यांनी बंद लखोट्यात दिली नाही. त्यामुळे स्थायी समिती सदस्य नियुक्ती दरम्यात बेकादेशिर पद्दतीचा अवलंब केल्याने शिवसेनेच्या गटनेत्याने सुचविलेल्या सदस्यांची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या