Friday, May 3, 2024
Homeनाशिकरेल्वे मार्गासाठी फेरसर्व्हेक्षण करा

रेल्वे मार्गासाठी फेरसर्व्हेक्षण करा

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी जमिनी संपादित केल्यास निफाड तालुक्यातील शेतकरी भूमिहीन होणार आहे.

- Advertisement -

तालुक्यातील लासलगाव, कोटमगाव, टाकळी विंचूर, उगाव, शिवडी, खेडे, नांदुर्डी, निफाड, कुंदेवाडी, कसबे सुकेणे, खेरवाडी, चितेगाव या गावांच्या शिवारातून गेलेल्या मध्य रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणासाठी पुन्हा सर्वेक्षण करुन प्रशासन नोटीस देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेने या भागातील शेतकरी धास्तावले आहेत.

ज्याप्रमाणे इगतपुरीतील शेतकरी व लोकप्रतिनिधींनी केलेल्या उठावामुळे फेरसर्वेक्षणाचे आश्वासन मिळाले आहे. त्याप्रमाणे संपूर्ण मार्गावर फेरसर्वेक्षण करण्याची मागणी लासलगाव परिसरातून केली जात आहे.

या रेल्वे लाईनजवळून तिसरी व चौथी रेल्वेलाइन सुरू करण्याच्या विचारात मध्य रेल्वे प्रशासन असून या रेल्वेमार्गालगत असलेल्या शेतांचे सर्वेक्षण दीड वर्षापूर्वी रेल्वे मार्गालगतच्या दुतर्फा ड्रोन कॅमेर्‍याद्वारे करण्यात आले होते.

त्यानंतर शेतांमध्ये सांकेतिक खुणा करण्यात आल्या होत्या. याबाबत शेतकर्‍यांना विचारणा करुनही माहिती दिली गेली नव्हती. मात्र इगतपुरी तालुक्यात रेल्वेमार्गालगत असलेल्या शेतकर्‍यांच्या गटनंबरसह नोटिसा प्रसिद्ध होताच खासदार, आमदारांनी आवाज उठविताच फेरसर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला

असला तरी तो संपूर्ण रेल्वेमार्गासाठी आहे की केवळ इगतपुरी तालुक्यासाठी आहे याबाबत येथील शेतकर्‍यांच्या मनात साशंकता आहे.

शेतकर्‍यांच्या मते खासगी एजन्सीकडून थेट शेतकर्‍यांच्या गट क्रमांकासह माहिती व गावनकाशे संकलित केले जात आहेत. त्याबाबतही माहिती दिली जात नाही. पिढ्यान् पिढ्या याच शेतीवर शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.

प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी जमिनी संपादित केल्यास तालुक्यातील शेतकरी भूमिहिन होणार असल्याने लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून फेरसर्वेक्षणासाठी लढा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चांदवडमधून विरोध

चांदवड तालुक्यातील काही गावात संबंधित रेल्वे विभागाच्या भूसंपादनासाठी काही अधिकार्‍यांनी भेटी देऊन ग्रामस्थांशी प्रस्तावित भूसंपादनाबाबत चर्चा केली. त्यात अनेक शेतकर्‍यांनी या प्रस्तावास विरोध दर्शविला आहे. द्राक्षबागायती भागातून रेल्वेमार्गाला जमिनी संपादित केल्या जाऊ नये अशी भूमिका शेतकरी मांडत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या