Thursday, May 2, 2024
Homeनाशिककरंजवण धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्याची मागणी

करंजवण धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्याची मागणी

म्हेळूस्के । वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या व निफाड, येवला, मनमाड तालुक्याला पाणी पुरवठा करणार्‍या करंजवण धरणातून गेल्या 30 दिवसापासून पाणी सोडण्यात आले आहे. सध्या धरणामध्ये 21% पाणी साठा शिल्लक राहिला आहे. स्थानिक दिंडोरी तालुक्यातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा विचार करून भविष्यातील येणारे पाणी टंचाई लक्षात घेता लाबलेले आर्वतन बंद करण्यात यावे,अशी मागणी करंजवण, ओझे, खेडले, म्हेळूस्के, लखमापूर, नळवाडी, जोरण, पिंपळगाव धुम, नळवाडपाडा, चारोसे आदी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisement -

चालू वर्षी दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे करंजवण धरण 93% भरले होते. त्यामुळे चालू वर्षी कादवा नदीला पुराचे पाणी आले नाही. त्या तुलनेत निफाड, येवला, मनमाड या परिसरात दरवर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस पडला होता, मात्र या तालुक्याचे करंजवन धरणातील पाण्यावर आरक्षण असल्यामुळे पाणी त्यांना पाणी सोडावेच लागते.

करंजवण धरण क्षेत्रात मागील वर्ष 1244 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्येच करंजवण धरण 100% भरले होते. त्या तुलनेत यावर्षी करंजवण धरण क्षेत्रात फ्कत 890 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी करंजवण धरण क्षेत्रात 354 मिलीमीटर इतका कमी पाऊस पडला आहे. मागील वर्षी दिडोरी तालुक्यात 1686.1 मिलीमिटर इतका पाऊस पडला होता तर चालू वर्षी तालुक्यात 911.45 मिलीमिटर इतका पाऊस पडला आहे. म्हणजे दिंडोरी तालुक्यात मागील चार वर्षाच्या तुलनेत खूपच कमी पाऊस पडला आहे.

पश्चिम भागातील नदी-नाल्यांना पूर आलाच नाही. पाऊस लांबल्यास तालुकयात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. यासाठी जलसंपदा विभागाने करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन त्वरित बंद करू महिन्याच्या टप्याटप्पाने आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

करंजवण धरणातून 30 दिवसापासून सोडलेले पाणी येत्या दोन दिवसात बंद होणार आहे. पुढील दोन महिन्याचा विचार करता तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ व पाटबंधारे विभाग यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात करंजवण धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यात येणार आहे.

नरहरी झिरवाळ, विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य

- Advertisment -

ताज्या बातम्या