राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शनिवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरून 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथे बाजार तळानजीक बाबुराव पाटील मंदिरासमोर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत काही जण जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेची माहिती समजताच मोठा पोलीस फौजफाटा देवळालीत दाखल होऊन जमावाला घटनास्थळावरून पांगविले.
याबाबत निखिल धोत्रे रा. देवळाली प्रवरा याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, निखिल धोत्रे व इतर देवळाली प्रवरा येथील एका किराणा दुकानासमोर उभे असताना लक्ष्मण म्हस्के, विकी म्हस्के, शुभम चव्हाण, राहुल इंगोेले, दीपक इंगोले, अक्षय इंगोले सर्व रा. इनामवस्ती, देवळाली प्रवरा यांनी एकत्र येऊन प्रशांत म्हस्के, बाबासाहेब पवार, अजय धोत्रे, विजय इथापे यांना शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. या हाणामारीत राहुल इंगोले याने प्रशांत म्हस्के तर अक्षय इंगोले याने बाबासाहेब पवार यांच्या डोक्यात लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर नातेवाईक सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत निखील धोत्रे याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.उप.नि. धर्मराज पाटील करीत आहेत.
दुसरी फिर्यादीत विकी अशोक म्हस्के रा. देवळाली प्रवरा याने म्हटले, बाबासाहेब पवार उर्फ रोंग्या, प्रशांत म्हस्के उर्फ परशा, निखिल धोत्रे, विजय इथापे उर्फ खंड्या, अनिल इरले उर्फ खली, आंबादास इरले उर्फ कालू सर्व रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी यांनी एकत्र जमवून आम्हाला शिवीगाळ करून आमच्यावर केस करताय काय? आम्हाला त्रास झाला असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी प्रशांत म्हस्के याने टणक वस्तूने विकी म्हस्के याच्या कपाळावर, तोंडावर व खांद्यावर मारहाण केली. तसेच चुलते लक्ष्मण म्हस्के यांच्या दुचाकीवर दगड घालून नुकसान केले. तुम्ही केस मागे घ्या, नाही तर तुम्हाला एका-एकाला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. सदर भांडणात फिर्यादीच्या मावशीचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केली व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढिल तपास शिर्डीचे डीवायएसपी शिरीष ओमने करीत आहेत.