सह्याद्री हे महाराष्ट्राचे प्राणपवित्र अधिष्ठान आहे. अधिष्ठान या संज्ञेमागे असे कितीतरी पदर आहेत? याची काय आणि कशी मोजदाद करणार? कारण सह्याद्रीच्या कुशीत इथून तिथपर्यंत जी सधनता, समृद्धता नांदते आहे, ती केवळ याचं सह्याद्रीमुळे. तीच्या उदरात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक, कलागुणांची, समृद्ध आचार विचारांची पेरणी होतं गेली, होत राहिली. त्याचंमुळे महाराष्ट्र हे साजेसें नावही लाभलें. आजही ते इथल्या प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. सह्याद्री हा महाराष्ट्र स्वातंत्र्याचा व स्वराज्याचा मूलाधार आहे.
महाराष्ट्राला वैभवशाली व समृद्ध परंपरा लाभली ती सह्याद्री कारणे! ती टिकून राहिली, तीही फक्त सह्याद्री कारणे! कारण महाराष्ट्राचं अधिष्ठानच मुळी बलदंड सह्याद्री आहे. मराठी मनांवर तो एखाद्या राजासारखा राज्य करीत आहे. अगदी एखाद्या चिरंजीव शासनकर्त्यासारखा! महाराष्ट्रावर अनेक संकटे आली. अनेक परकियांनी राज्य केले. त्या आक्रमणातून तावून-सुलाखून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवला तो याचं सह्याद्रीने. याचं सह्यकुशीत एका महान छत्रपतींचा जन्म झाला. या दर्याखोर्यांत जन्मलेला लोकातीत राजा म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवराय! परकियांच्या मगरमिठीतून महाराष्ट्र मोकळा श्वास घेऊ लागला तो शिवरायांच्या अभूतपूर्व दूरदृष्टी, पराक्रमी घोडदौडीमुळे. सह्याद्री पर्वतांचा व त्यावरील गडकिल्ल्यांचा अतिशय चाणाक्षपणे व खुबीने उपयोग करून स्वराज्याची तेजस्वी ज्योत तेवत ठेवली ती शिवरायांनी. स्वराज्याचा मंत्र येथील जनमानसात रुजवून दिल्लीच्या तख्तावर असणार्या बलाढ्य पातशहाला, ज्याच्या मृत्यूनंतर आणि संभाजीराजे कैदेत असताना येथे मरण पत्करावे लागले; पण स्वराज्य जिंकता आले नाही अशी ज्वाला सामान्य मावळ्यांच्या हृदयात जागृत करणारा दूरदृष्टीचा राजा!
म्हणून सह्याद्री हे महाराष्ट्राचे प्राणपवित्र अधिष्ठान आहे. अधिष्ठान या संज्ञेमागे असे कितीतरी पदर आहेत. याची काय आणि कशी मोजदाद करणार? कारण सह्याद्रीच्या कुशीत इथून तिथपर्यंत जी सधनता, समृद्धता नांदते आहे, ती केवळ याचं सह्याद्रीमुळे. तीच्या उदरात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक, कलागुणांची, समृद्ध आचार विचारांची पेरणी होत गेली, होत राहिली. त्याचंमुळे महाराष्ट्र हे साजेसे नावही लाभले. सह्याद्री हा महाराष्ट्र स्वातंत्र्याचा व स्वराज्याचा मूलाधार आहे.
अरवली, विंध्य, सह्याद्री हे भारतातील मुख्य पर्वत. त्यामुळे भारताची प्रादेशिक मांडणी व विभागणी झालेली दिसते. सिंधूचे मुलुख मैदान, गंगेचे मैदान, सह्याद्रीचे पठार,असे भारताचे तीन प्रमुख मुख्य नैसर्गिक विभाग आहेत. काश्मिर व आसाम हे निसर्गता स्वतंत्र आहेत. हिमालयाने भारताला आशियापासून अलग केले आहे. विंध्याद्रीमुळे भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पडलेले आहेत. सह्याद्री हा दक्षिणेचा निर्माता आहे. महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक हे पश्चिम किनार्यावरचे तीन प्रमुख विभाग होतं. कोकण व घाटमाथा आणि पठारे व मैदानें हे महाराष्ट्राचे मुख्य भौगोलिक विभाग आहेत.
इथल्या नद्या, सधन शेती, मंदिरे, लेणी, गडकिल्ले, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व भौगोलिक जडणघडणीत सह्याद्रीच मुळ गाभा आहे. कोंकण, घाटमाथा, पठारे आणि मैदानें हे महाराष्ट्राचे मुख्य भौगोलिक विभाग आहेत. हे भिन्न असले तरी त्या सर्वांचे अंतर्याम एकच आहे. तो म्हणजे सह्याद्री.
भारतातील डोंगररांगांमध्ये हिमालयाच्या खालोखाल विस्तार आपल्या सह्याद्रीचाच आहे. सह्याद्रीची मुख्य रांग गुजरात तापी तिरापासून तर थेट कन्याकुमारीपर्यंत तालेवारपणे पसरलेली आहे. तीची एकूण लांबीचं जवळपास अकराशे मैलांची आहे. तापी नदीपासून पालघाटपर्यंत सह्याद्री सलग असून त्यानं आठशे मैलांचं अंतर व्यापले आहे. कळसूबाई हे उत्तरेकडील सर्वोच्च शिखर, तर महेंद्र पर्वत हे दक्षिणेकडील शेवटचे शिखर. नाशिक जिल्ह्यातील वायव्य कोपर्यात सह्याद्रीच्या सातमाळा रांगेचा प्रारंभ होतो. हातगडापासून ते अंकाई टंकाई किल्ल्यापर्यंत ते सलग पसरलेली आहे. धोडप किल्ला (४६७१ फुट) हे सर्वोच्च शिखर आहे. सप्तशृंगी, मार्कंडेय याच रांगेत अधिवास करत आहेत. अंकाई-टंकाईपासून सातमाळा रांगेची अजिंठा शाखा सुरू होते. ह्या शाखेची एक फांदी कन्नडवरून बुलढाण्यापर्यंत गेलेली आहे. दूसरी देवगिरीवरून परभणीपर्यंत. पहिल्या रांगेत अजिंठा लेणी आहेत तर दूसर्या रांगेत वेरूळ लेणी.
हरिश्चंद्र गडापासून पश्चिमेला सुटलेली सह्याद्रीची शाखा अकोळनेरजवळील पठारांत विलिन होऊन जेऊरनजीक पुन्हा डोकं वर काढते. या रागांना बालाघाट संबोधतात. तुळजापूर व अंबेजोगाई हीं भक्तिस्थाने याचं बालाघाटावर येतात. रायरेश्वरापासून किंवा मांढरा देवापासून शिंगणापुरापर्यंत विस्तार झालेल्या शाखेला महादेव रांग म्हणतात. महाराष्ट्राच्या पठारावर आणि कोकणांत सह्याद्रीच्या अनेक लहान मोठ्या शाखा पसरलेल्या आहेत. या डोंगरांगा म्हणजे महाराष्ट्राचे समर्थ स्नायू आहेत. यामधून वाहणार्या नद्या म्हणजे धामण्या आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील दुर्ग व समुद्र तीरावरील जंजिरे सामर्थ्याची केंद्रे आहेत.
गोदावरी खोर्यात सातमाळा व बालाघाट रांगा विसावल्या आहेत. त्र्यंबकेश्वर हा या खोर्याचा स्वामी. बालाघाट व महादेव या श्रेणीं दरम्यानचे खोरे भीमेचे. भिमाशंकर या खोर्याचा स्वामी. महादेव दक्षिण रांगेतील खोरे कृष्णेचे. महाबळेश्वर या खोर्याचा स्वामी. गोदावरीची वृत्ती सात्विक आहे, तर कृष्णेची तामसी. भीमा ही या वृतींचा समन्वयक. भीमा ही मोक्षाची सीमा, गोदावरी ही प्रभू रामचंद्रांची, भीमथडी ही पंढरीरायाची. गंगाथडी हा सप्तशृंगीचा, भीमथडी तुळजापूर भवानीचा. कृष्णथडी कोल्हापूरच्या अंबाबाईचा. कृष्णथडीचा नामदेव आणि गंगाथडीचा ज्ञानेश्वर यांचे समन्वयक तुकोबा भीमथडीचे. गंगाथडीचे नाशिक धर्म क्षेत्र, भीमथडीचे पुणे हे कर्मक्षेत्र, तर सातारा हे कृष्णेचे वीरक्षेत्र. या तीनही क्षेत्रांचा आविष्कार हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मुळाधार आहे, ती याचं सह्याद्री कारणें. इतकी गुंतागुंत असूनही महाराष्ट्राची सारी धार्मिकता गुण्यागोविंदाने नांदत आहे, हे केवढे आश्चर्य. महाराष्ट्रातील पाऊस, हवामान आणि पाणी पुरवठा सह्याद्रीवरचं अवलंबून आहे. पर्जन्याचा नकाशा सह्याद्रीच्याचं अनुरोधाने काढला जातो. पर्जन्याचे माप ज्या त्या स्थळांच्या उंची व झाडी यांवर अवलंबून असते. खरंतर सह्याद्रीपासून दूर जाल तसे पर्जन्यमान कमी होत जाते. महादेव हा सह्याद्रीचा स्वामी आहे. त्याचा पुत्र खंडोबा हा कडे पठाराचा स्वामी, तर विठ्ठल हा देशभागाचा आणि परशूराम हा कोकणाचा स्वामी. ही सगळी विगतवारी करतांना सह्याद्री हाच मुळी गाभा आहे हे कधीही विसरता येणार नाही.
सह्याद्रीमुळे महाराष्ट्राची नैसर्गिक विभागणी झालेली आहे. कोकण आणि देश. दूसरी घाटमाथा आणि मावळ. महाराष्ट्राचा दक्षिण भाग हा खुद्द सह्याद्रीच्या अधिपत्याखाली आहे, तर उत्तर भाग हा सातपुड्याच्या प्रभुत्वाखाली. घाटमाथा कोंकणापासून तुटक असला तरी त्यावर कोकणाची छटा दिसते आणि मावळावर देशाची. सातपुड्यावर विदर्भाची. सह्याद्री ही भूमी मुळची कातवडी व रामोशी या जमातींची. तर सातपुडा ही भिल्ल व गोंडांची. कोळी व वारली जमाती त्यांना जोडणारा दुवा. कोकण ही भूमी कोळी व भंडारी यांची. मावळ हा त्यांना जोडणारा दुवा. हे दुवे जितके प्रबळ होतील तितके महाराष्ट्राचे ऐयही प्रबळ होईल.
डोंगरी किल्ले हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्राइतके किल्ले अन्य कुठल्याही प्रदेशात नाहीत. इतिहासाची आठवण करून देणारे हे किल्ले महाराष्ट्राची स्पंदनं आहेत. सह्याद्रीभूमी ही प्रवृत्ती प्रधान व वीरभूमी आहे. आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी व शत्रूचा नि:पात करण्याकरिता उठावासाठी सह्याद्रीसारखी दूसरी पर्वतश्रेणी नाही. सातमाळा, बालाघाट, महादेव या सह्याद्रीच्या ३ मुख्य पर्वत शाखा. सातमाळेची रांग नाशिक व खानदेश यांच्या सीमेवर आहे. अजंठा ही आग्नेय दिशेकडे कलंडलेली रांग नाशिक जिल्ह्यातूनचं जाते. महाराष्ट्राच्या गाभ्याचे संरक्षण करण्यासाठी या रांगेने अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे हे इतिहास सांगतो. ४०० हून अधिक गडकिल्ल्यांची भूषणे आजही महाराष्ट्राच्या अभिमानी बुलंद मस्तकावर तेजस्वी, पराक्रमी इतिहासाची साक्ष ठेवून उभी आहेत. या गडकोटांचे दर्शन हें सह्याद्रीच्या स्वातंत्र्य प्रेरकतेचे व आदिशक्तींचे पूजन आहे.जे आम्हा भाग्याची लक्षणे आहेत व वैभवाचीही मूलस्थाने आहेत.
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर अनेक प्रभागात लेण्यांच जाळ विणलं गेलं आहे. आज तो एक सांस्कृतिक व कलेचा ठेवा आहे. लेण्या खोदण्याची प्रथा सातवाहनांपासून राष्ट्रकुटार्यंत प्रचलित होती. सह्याद्रीतील लेणी हीं महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन ज्ञात धर्मक्षेत्रे आहेत. मंदिरे उभारण्याच्या विशिष्ट प्रथा चालुय व यादव यांच्या आमदानीत सुरू झाल्याचा इतिहास सांगतो आहे.
असा विविध अंगी व गुणी सह्याद्री. सह्याद्रीकडे बघून कुणीही महाराष्ट्रीयाने म्हणावे..
आहे रक्त तुझेंच खेळत पहा या रोमारोमांतूनी..
संजय अमृतकर – गिर्यारोहक
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा