Saturday, July 25, 2026
HomeनगरSangamner : संगमनेर तालुक्यातील वाळूमाफियांना कोणाचे अभय?

Sangamner : संगमनेर तालुक्यातील वाळूमाफियांना कोणाचे अभय?

अंधाराचा फायदा घेत दररोज होतेय मोठ्या प्रमाणावर वाळूतस्करी

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील नांदूर खंदरमाळ परिसरासह खैरदरा, लहूचामळा, अकलापूर परिसरातील शेळकेवाडी, घारगाव, संगमनेर खुर्द, खांडगाव, निंबाळे, वाघापूर, निमज भागातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या अवैध वाळू उत्खननामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असतानाच पर्यावरणीय हानी देखील होत आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा प्रकार सुरू असतानाही महसूल विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत वाळू उपसा करून ती ट्रॅक्टर, डंपर आणि इतर वाहनांच्या माध्यमातून विविध ठिकाणी नेली जात आहे. अनेक ठिकाणी नदीपात्रे आणि ओढ्यांमधून नियमबाह्य पद्धतीने वाळू काढली जात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वाळू तस्करांनी या भागात अक्षरशः धिंगाणा घातल्याचे चित्र असून त्यांच्यावर कोणत्याही यंत्रणेचा वचक राहिलेला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असतानाही महसूल विभाग, स्थानिक प्रशासन किंवा संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या तस्करांचे मनोबल वाढल्याचे बोलले जात आहे.

खैरदरा, लहूचामळा, शेळकेवाडी आणि घारगाव परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेकदा नागरिकांनी तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असताना संबंधित विभागाला याची माहिती नाही का, की माहिती असूनही दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही नागरिकांनी तर या वाळूतस्करांना कोणाचे तरी अभय मिळत असल्याची चर्चा सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनाने या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी तातडीने आणि प्रभावी कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रांची झीज, भूजल पातळीवर होणारा परिणाम, शेती क्षेत्राला निर्माण होणारे धोके आणि पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. तसेच संबंधित भागात संयुक्त पथके तयार करून रात्रीच्या वेळी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या अवैध वाळू उपशाच्या प्रकाराकडे जिल्हा प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा येत्या काळात या अवैध व्यवसायाचे जाळे आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या बातम्या

Onion Rate : घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

0
नेवासा | Newasa येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) शनिवारी कांद्याची 55 हजार 373 गोण्या आवक झाली. भाव 2700 रुपयांपर्यंत...