दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षांचा निकाल लागायला अजून बराच अवधी आहे. तरीही परीक्षा आणि निकालाच्या ताणतणावामुळे विद्यार्थ्यांनी चुकीचा मार्ग अवलंबण्याच्या घटना हल्ली घडू लागल्या आहेत. एका मुलीला बारावीचा एक पेपर अवघड गेला.
नापास होऊ आणि पालक रागावतील या भीतीने ती मुलगी घरी गेलीच नाही. ‘घरी फोन करायचा आहे’ असे म्हणून तिने एका व्यक्तीचा फोन मागितला आणि ‘मी घर सोडून जात आहे’ असा निरोप आईला दिला. त्यामुळे पालकांचे धाबे धणाणले. त्यांनी पोलिसांची मदत घेतली. मुलगी मावशीच्या घरी गेल्याचे पोलिसांनी शोधून काढले. कमी गुण मिळाले तर पालक रागावतील या भीतीने घर सोडल्याचे तिने कबूल केले. दुसरी घटना मालेगाव येथे घडली. बारावीची परीक्षा सुरू होण्याच्या काही तास आधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी परीक्षेच्या ताणामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विपरित घटना घडू नयेत म्हणून राज्य सरकार आणि शाळांनी समुपदेशक नेमले आहेत. त्यांचे चलबोलांकही (मोबाईल नंबर) जाहीर केले आहेत.
वाढती स्पर्धा, शिक्षण पद्धतीतील पठडीबद्ध दृष्टिकोन आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची ओढाताण होत आहे. हे ओझे पेलवेनासे अशक्य झाले की विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. समुपदेशन हा या समस्येवरचा एक उपाय आहे. या समस्येशी संबंधित सर्वच घटकांचे समुपदेशन करावे लागेल. हुशार विद्यार्थ्याची व्याख्या बदलावी लागेल. परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवले म्हणजे तो विद्यार्थी हुशार आणि न मिळवणारा विद्यार्थी ‘ढ’ अशी गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची सरसकट दोन टोकात विभागणी केली जाते. शासन, पालक आणि शिक्षकांनाही ती मान्य आहे. ‘ढ’ विद्यार्थी जगायला लायक नसतात का? त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळाले नसतील, पण म्हणून त्यांच्या अंगी कोणतीच हुशारी किंवा क्षमता नसते का? मुलांचे आनंदाने जगणे महत्त्वाचे की त्यांना मिळणारे गुण? गुणांनाच महत्त्व असेल तर मग व्यवहार कौशल्य, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आवडत्या क्षेत्रात प्रगतीची धडपड करणे याला काहीच किंमत नाही का? या प्रश्नांची उत्तरे सरकार, पालक आणि शिक्षकांना प्रामाणिकपणे शोधावी लागतील.
मुलांच्या अंगभूत क्षमतांचा शोध संवेदनशीलतेने घ्यावा लागेल. याकामी शिक्षक व पालकांनी एकमेकांना पूरक भूमिका घ्यायला हवी. बरेच पालक आपल्या मुलांची इतरांशी तुलना करतात. मुलांना त्यांच्या क्षमता आणि आवडीनुसार शिकू द्यावे. मुले ही मुले असतात. त्यांच्याही आवडीनिवडी व अपेक्षा असतात. शिक्षक आणि पालकांच्या अपेक्षापूर्तीचे ती साधन नसतात हे संबंधित सर्वांनाच समजावून सांगण्याची वेळ आली आहे.