राजकीय पक्ष वा वेगवेगळ्या विचारांचा प्रचार व प्रसार करणार्या संघटनांच्या कार्यक्रमांत सहभागी होण्यास विद्यापीठांना मनाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मनाई केल्यानंतरही अशा कार्यक्रमांत विद्यापीठांचा सहभाग आढळला तर संंबंधित अधिकारी व पदाधिकार्यांवर कारवाई केली जाईल’ असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. देशातील वातावरण विखारी होत आहे. भेदाभेदाचे आणि कट्टरतावादाचे विष तरुणाईला उद्ध्वस्त करीत आहे. सामाजिक समता आणि बंधुता धोक्यात आली आहे. ‘हा आपला… तो परका’ असे एकारलेपण तरुणाईत रुजत आहे.
दिल्लीच्या दंगलीतील जाळपोळीत शाळकरी मुलेसुद्धा तरुणाईसोबत ओढली गेल्याचे आढळते. सामाजिक दंगलींमध्ये तरुणाईचा सहभाग हा चिंतेचा विषय आहे. तरुणाईच्या वर्तनाशी संबंधित कोणत्याही मुद्यांची चर्चा मूल्यशिक्षणाशी येऊन ठेपते. व्यक्तिमत्त्व विकासात मूल्यशिक्षण कळीची भूमिका बजावते. मूल्यशिक्षणाची रुजवण विद्यार्थ्यांमध्ये करणे ही केवळ विद्यापीठांची जबाबदारी आहे का? आजकालच्या अनेक विध्वंसक घटनांची पाळेमुळे विधिमंडळांपर्यंत जाऊन पोहोचतात.
नेतेमंडळी चिथावणीखोर भाषणे करतात. त्याबद्दल कारवाई सुचवणार्या न्यायाधिशाची रातोरात बदली होते. त्यातून समाजात आणि विद्यापीठांत स्वच्छ नीतिमत्तेचा संदेश जाणार का? कोणत्याही विचारांचा प्रचार व प्रसार फक्त विद्यापीठातूनच होतो का? कायद्याने वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या कुणालाही जबाबदार नागरिक मानले जाते. त्यातूनच देशातील राजकीय व सामाजिक संस्थांचे नेतृत्व उभे राहते. अठरा वर्षांचे सज्ञानपण मान्य केल्यानंतर कोणी विद्यापीठात शिकतो किंवा शिकवतो म्हणून त्याचे घटनादत्त अधिकार संपुष्टात येऊ शकतील का? फक्त तरुणाईला देशातील प्रत्येक गोष्टीबद्दल जबाबदार धरून नैतिक मूल्यांची रुजवण कशी होणार? तो प्रयत्न म्हणजे रोग झाडाच्या मुळांना आणि उपचाराचा फवारा फक्त पाने-फांद्यांवर असेच होणार ना? आधुनिक संवादसाधनांमुळे ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे’ या जाहिरात वाक्याप्रमाणे जग खरोखरच तरुणाईच्या मुठीत आहे.
समाज माध्यमांमुळे जगाच्या कानाकोपर्यात काय सुरू आहे याची बित्तंबातमी तरुणाईपर्यंत अक्षरश: सेकंदात पोहोचत आहे. समाजात जे दिसत आहे त्याचाही विलक्षण प्रभाव तरुण पिढीवर होतो. या पार्श्वभूमीवर त्या पिढीला सामाजिक वातावरणापासून अलिप्त ठेवायचे ठरवले तरी ते शक्य होईल का? जगाचे ज्ञान देणार्या आधुनिक तंत्रज्ञान व साधनांपासून देशातील तरुण वंचित राहून चालेल का? तरुण पिढीचे सामाजिक वर्तन बदलल्यासारखे का वाटते? याच्या मूळ कारणांचा शोध घ्यावा लागेल. सध्याच्या कट्टरतावादाच्या काळात असा शोध घेणे सोपे नाही. विरोधी मते व्यक्त करणार्यांचे आवाजसुद्धा कायमचे बंद केले जात आहेत.
अशावेळी सामाजिक मूल्यांची प्रत्यक्ष जीवनात अंमलबजावणी करून योग्य सामाजिक वर्तनाचे उदाहरण तरुणाईला घालून देणे हे मोठ्यांचे नैतिक कर्तव्य आहे याची जाणीव विधिमंडळे तरी बाळगतात का? पुढील पिढी भरकटू नये यासाठी या समस्येचा बहुआयामी विचार होणे आवश्यक आहे. विशिष्ट राजकीय विचारांचा प्रभाव टाळून या समस्येचा विचार होऊ शकेल, अशी आशा सध्याच्या परिस्थितीत करावी का?