नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक महानगरपालिकेच्या स्मार्ट स्कूलच्या उभारणीला अडसर ठरलेल्या इमारत दुरुस्ती कामाला अखेर मंजुरी मिळाली असून लवकरच निविदा काढून या कामाला प्रारंभ केला जाणार असल्याचे शहर अभियंता उदयकुमार वंजारी यांनी सांगितले. दै. ‘देशदूत’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच मनपा प्रशासनाने गती पकडत महासभेत आर्थिक तरतूद मिळवत कामाला प्रारंभ केल्याचे चित्र आहे.
स्मार्ट स्कूलच्या यंत्रणा उभारण्यापूर्वी शाळांची दुरुस्ती होणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्यामुळे स्मार्ट स्कूल उभारणार्या यंत्रणांनी काम थांबवून ठेवले. तत्कालिन मनपा प्रशासन अधिकारी सुनिता धनगर यांनी याबाबत वेळोवेळी बांधकाम विभागाला पत्र लिहिल्याचे सांगितल होते. मात्र या कामांना विशेष महत्त्व दिले गेले नसल्याचे दिसून आले.
शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा; पाचवी, आठवीच्या परीक्षांबाबत महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर
परिणामी स्मार्ट स्कूल व क्लास रुमची एक जून रोजी सर्व शाळांमध्ये ट्रायल घेणे निश्चित झाले होते. मात्र यंत्रणात उभारली गेली नसल्यामुळे केवळ काठे गल्लीतील एकमेव शाळेची पाहणी करण्यात आली. स्मार्ट होणार्या 69 शाळांपैकी 68 शाळांचे विकासकाम प्रलंबित ठेवण्याची नामुष्की महापालिकेवर आली होती.
ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी
परिणामी मनपा बांधकाम विभागाने तातडीने पहाणी करुन त्याबाबतची कागदपत्रांची पूर्तता करत सुमारे साडेअकरा कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळवली आहे. यात सर्वाधिक खर्च सातपूर परिसरातील शाळांवर (3.5 कोटी), नाशिकरोड(3 कोटी), नाशिक पूर्व (2 कोटी) नाशिक पश्चिम (दीड कोटी), पंचवटी (1.75 कोटी)तर नवीन नाशिकसाठी फक्त 50 लाख रुपये खर्चाची विभागणी करण्यात आली असून याबाबत लवकरच निविदा काढून कामाला सुरुवात केली जाणार आहे.
नवीन दुरुस्तीकाम उशिराने सुरू होण्यामुळे स्मार्ट सिटीची कामेही ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षाचे पहिले तीन महिने मुले स्मार्ट स्कूलपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सध्या मनपाच्या शाळांमध्ये25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मनपाने स्मार्ट स्कूल झाल्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षात 50 हजार मुलांचे उद्दिष्ट ठेवले होते. ते आता नव्या वर्षात पूर्ण करण्याचा विडा उचलावा लागण्याची शक्यता आहे.