Monday, May 6, 2024
Homeधुळेकरोनाच्या संकटकाळात दोन्ही बाजूने माणुसकी जपायलाच हवी

करोनाच्या संकटकाळात दोन्ही बाजूने माणुसकी जपायलाच हवी

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

करोनाचे संकट मोठे आहे. या संकटाचा आपल्या सार्‍यांना एकजुटीने सामना करायचा आहे. मात्र अशाकाळात संकटालाही संधी समजून कुणी रुग्णांची आर्थिक लुट करीत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे.

- Advertisement -

डॉक्टर्स, विविध खासगी हॉस्पिटलमधील व्यवस्थापन आणि इतरांनी ही बाब मानवतेच्या भावनेतून समजून घ्यावी. तसे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनीही सेवा देणार्‍यांना समजून घ्यावे. दोन्ही बाजूने माणुसकी जपली जायला हवी, अशी अपेक्षा आजच्या चर्चेतून व्यक्त करण्यात आली.

दै.देशदूतच्या संवाद कट्टा या ऑनलाईन कार्यक्रमात आज ‘माणसांनो, माणुसकी जपा’ या विषयावर चर्चा करण्यात आली.

यात गेल्या 30 वर्षांपासून रुग्णसेवा देणारे आरोग्यदूत गोकुळ राजपूत, युवासेेनेचे प्रदेशसहसचिव अ‍ॅड.पंकज गोरे, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे सदस्य सचिन शेवतकर आणि माजी नगरसेवक संजय वाल्हे यांनी सहभाग घेतला. ब्युरोचिफ अनिल चव्हाण यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

श्री.राजपुत म्हणाले सगळेच आजार कोरोनाशी निगडीत नाही. बदलत्या हंगामानुसार काही तात्पुरत्या साथी सुरु होतात. त्यांच्यावर वेगळ्या व्यवस्थेत वेळीच उपचार झाले तर अनेक तपासण्यांमधुन अशा रुग्णांना जावे लागणार नाही.

सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये देखील असे रुग्ण तपासले जायला हवेत. तसेच कोरोनाच्या लक्षणांमुळे स्वॅब देणार्‍या रुग्णांवर त्यांचे रिपोर्ट येईपर्यंत उपचार केले जात नाहीत तोपर्यंत संबंधित रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्याने एकाच कुटुंबातील अनेक सदस्य बाधित होण्याचे प्रमाण वाढते आहे. हे थांबवाचे असेल तर लक्षणे असणार्‍या रुग्णांवर लगेचच उपचार होणे गरजेचे आहे.

तसेच रुग्णांनी लगेचच घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. केवळ भितीपोटी वेगवेगळे हॉस्पिटल फिरुन मनात आधीच भिती निर्माण करुन घेतल्यामुळे कोरोनापेक्षा त्याची दहशत जास्त वाढलेली दिसते आहे.

अशा रुग्णांना पुन्हा जास्तीचे न घाबरवता डॉक्टरांनी त्यांचे समुपदेशन करणेही गरजेचे आहे. तसेच सगळ्या रुग्णांना सरसकट सीटी स्कॅन करण्यास सांगणे हे देखील योग्य नाही, असेही ते म्हणाले.

श्री.शेवतकर यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सुरु असलेल्या उपचारांबाबत समाधान व्यक्त करतांना अनेक डॉक्टर्स, कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेवून रुग्णांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

तरीही बाधित रुग्णांची रोजची संख्या बघितली तर संपर्काची साखळी खंडीत करणे अत्यंत गरजेचे आहे. दुर्दैवाने कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर त्यांच्या नातेवाईकांनी यंत्रणेला सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. एकीकडे सरकारी रुग्णालयांमध्ये चांगली सेवा दिली जात असतांना काही खासगी रुग्णालयात मात्र रुग्णांची अडवणूक करणे, वाढीव बिल वसुल करणे अशाही तक्रारी वाढत आहेत. यासाठी नागरिकांनी महापालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकांशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.

अ‍ॅड. गोरे यांनी डॉक्टर्स, कर्मचारी आणि नागरिकांनाही संयमाचे आवाहन केले. आपल्या सार्‍यांना कोरोनाशी लढायचे आहे. त्यामुळे परस्परांच्या मदतीला धावून जातांनाच आपल्याकडून सहकार्य करावे असेही ते म्हणाले.

हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात काही डॉक्टर्स सेवा बजावीत असले तरी याठिकाणच्या तक्रारी आमच्यापर्यंत येत आहेत. प्रत्येकाने स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक असून फक्त 15 दिवस शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर या जिल्ह्यातून कोरोना हद्दपार करता येवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री.वाल्हे यांनी आपल्या आक्रमक शैलीत प्रतिक्रिया नोंदविली. काही खासगी रुग्णालये आणि सीटीस्कॅन सेंटमध्ये रुग्णांची आर्थिक लूट होत असून अशाने डॉक्टर्स हे देवदूत असतात ही भावना नागरिकांच्या मनातून संपूष्टात येईल. किंवा चांगली सेवा देणार्‍यांचे मनोधैर्य खचेल.

वास्तविक शासनाने मागील वर्षीच कोरोना संदर्भातल्या उपचार दरांचे परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बिल आकारले जात नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सीटीस्कॅनची खरच आवश्यकता आहे का? असल्यास त्याचे किती पैसे घ्यावे याबाबतही नियमावली असल्याचे ते म्हणाले. मात्र कोणीही बेड अथवा रेमडिसीवर इंजेक्शनच्या नावाने लूट केल्यास आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते अजिबात शांत बसणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या