मुंबई । Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता अनेक बड्या नेत्यांचे इनकमिंग-आऊटगोईंग सुरु आहे. इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत.
इंदापूरमध्ये आज शरद पवार गटाची सभा आयोजित करण्यात आली आहे. याच सभेत भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेशावर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही नवीन काय सांगताय? ही आजची बातमी नाही, जुनी बातमी आहे,” अशी थोडक्यात प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये भेट झाली होती. यावर बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले होते की, मी शरद पवार यांची भेट घेण्याआधी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आमच्यामध्ये दीड ते २ तास चर्चा झाली. तेव्हा मी त्यांना सांगितले होते की, मला माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या विरोधात जाता येणार नाही. गेल्या १० वर्षांत माझ्या कार्यकर्त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. त्यांनी अन्याय सहन केला आहे. त्या माझ्या कार्यकर्त्यांने माझी साथ कधी सोडली नाही. असे त्यांनी सांगितले होते.