मुंबई | Mumbai
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. आज सकाळी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी आज संध्याकाळी चारच्या सुमारास माध्यमांशी बोलताना याबाबतच्या प्रश्नावर उत्तर दिले. या भेटीवेळी राज्यातील सध्याची स्थिती व आपल्या मागण्या यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सर्वकाही सांगितले असून ते ८ ते १० दिवसांत याबाबत निर्णय घेणार असल्याचे भुजबळ माध्यमांना म्हणाले. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
छगन भुजबळ यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ते मला भेटले आणि भेटल्यानंतर आमची काय चर्चा झाली, याबद्दल भुजबळांनी तुम्हाला (माध्यमांना) माहिती दिली आहे. वेगळ्याने माहिती देण्याची आवश्यकता नाही.” “भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष, मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहे. पण, आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयात त्यांचादेखील वाटा राहिला आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
छगन भुजबळांना मंत्रीपद नाकारले तेव्हा त्यांना डावलण्याचा हेतू नव्हता हे अजित पवारांनी आपल्याला सांगितल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. “मुळात भुजबळांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात घेतले नाही तेव्हा भुजबळांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता, त्यांनी मला त्याबाबत सांगितले. आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिला आहे. आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे. देशातल्या अन्य राज्यांतही मान्यता असणाऱ्या भुजबळांसारख्या नेत्याला आम्हाला राष्ट्रीय स्तरावर पाठवायचे होते, असे अजित पवारांनी मला सांगितले”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागच्या घडामोडींचा उल्लेख केला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचे आहे. भुजबळसाहेबांचे मत जरा वेगळे होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण, आम्ही सगळे मिळून यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजेत, यादृष्टीने त्यातून मार्ग काढला जाईल.”