Tuesday, February 3, 2026
HomeराजकीयDevendra Fadnavis : गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Devendra Fadnavis : गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई । Mumbai

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक किरण पालवे गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना मुंबईतील वरळी या पॉश परिसरात उघडकीस आली आहे. गौरी पालवे गर्जे (Gauri Palve Garje) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

- Advertisement -

गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी (१८ नोव्हेंबर) संध्याकाळी वरळी येथील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना समोर येताच वरळी पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. किरण आणि गौरीचा विवाह काही महिन्यांपूर्वीच झाला होता. आत्महत्येची माहिती मिळताच गौरीच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. गौरीच्या नातेवाईकांनी सांगितले की, लग्नानंतर काही महिन्यांतच गौरीला तिच्या सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. त्यांच्या या छळामुळेच गौरीने हे टोकाचे पाऊल उचलले, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

YouTube video player

पोलिसांनी सुरुवातीला फक्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. यामुळे गौरीच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. त्यांनी पोलिसांच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आक्रमक पवित्रा घेतला. अखेर कुटुंबीयांच्या दबावानंतर वरळी पोलिसांनी या प्रकरणात रविवारी (१९ नोव्हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. गौरी पालवे गर्जे यांच्या मामांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याची विनंती केली आहे. गौरीच्या मृत्यूमागील सत्य बाहेर यावे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

या गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया विचारले असता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली आहे. पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीच्या आत्महत्येवर आणि कुटुंबीयांनी केलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीवर फडणवीस म्हणाले, “अजून माझ्याकडे यासंदर्भातील पूर्ण ‘ब्रीफिंग’ आलेलं नाही. मला फक्त प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकदा पोलिसांनी पूर्ण माहिती दिल्यावरच मी याबाबत अधिक बोलू शकेन.”

वरळी पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. गौरीच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय आहे आणि छळाचे आरोप किती खरे आहेत, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा पुढील तपास कशा प्रकारे करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...