Wednesday, August 26, 2026
Homeनगरमहंत रामगिरी महाराजांना धमक्या दिल्या तर...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा

महंत रामगिरी महाराजांना धमक्या दिल्या तर…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा

राहता । Rahata

महाराष्ट्राची वारकरी परंपरा आणि सनातन संस्कृती ही आपल्या देशाची खरी ओळख असून संतांच्या विचारांवर आघात करणाऱ्या किंवा त्यांना धमक्या देणाऱ्यांची गय केली जाणार नाही; जर कोणी धमकी देण्याचे कृत्य केले, तर त्याला थेट नेस्तनाबूत करून टाकू, असा अत्यंत कडक आणि रोखठोक इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

- Advertisement -

श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पवित्र सोहळ्यात ते उपस्थितांशी संवाद साधत होते. सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांना गेल्या काही दिवसांत सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मंचावरून आक्रमक भूमिका घेत, महंत रामगिरी महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही संपूर्ण वारकरी संप्रदायाला दिली.

उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी भारतीय संस्कृतीचे प्राचीन महत्त्व अधोरेखित केले. ज्या वेळी युरोपातील देशांना संस्कृती, विचार आणि भाषेचे ज्ञान नव्हते, त्या काळात भारतात अत्यंत विकसित संस्कृती नांदत होती, असे सांगत परकीय आक्रमकांनी किल्ले जिंकले आणि मंदिरे तोडली असली, तरी ते भारतीयांच्या मनातील ईश्वराचे स्थान आणि वारकरी परंपरा नष्ट करू शकले नाहीत, असे प्रतिपादन त्यांनी केले. अखंड हरिनाम सप्ताहामुळे समाजात अभिसरण घडून येते आणि जातीय भिंती गळून पडतात, असेही ते म्हणाले.

तसेच सरला बेटाचे अध्यात्मिक महत्त्व विशद करताना त्यांनी हे बेट संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांसाठी ऊर्जेचे प्रमुख केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या ठिकाणी रस्ते, हॉल आणि पूर संरक्षणाची कामे वेगाने पूर्ण होत असून, आगामी काळात एका विशेष विकास आराखड्याद्वारे सरला बेटाचा कायापालट केल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा आणि अध्यात्मिक शक्तीचा खरा कणा असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताच्या योजनांची माहिती दिली. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू असून कालपर्यंत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांसाठी दर १५ दिवसांनी नवीन यादी जाहीर करून निधी वितरित केला जात आहे.

याशिवाय शेतकऱ्यांवरील ५८ लाख रुपयांची थकीत वीज बिलांची रक्कम पूर्णपणे माफ करण्यात आली असून, सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा ८ तास मोफत वीज दिली जात आहे. येत्या काळात ३६५ दिवस, दररोज १२ तास मोफत वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. वारकरी, शेतकरी, गरीब, दलित आणि शोषितांना सोबत घेऊनच शासन प्रगतीचा मार्ग चोखाळत राहील, असे आश्वस्त करत त्यांनी भाषणाची सांगता केली.

ताज्या बातम्या

Nashik Onion News : “रॅकमध्ये सडका अन् खराब…”; लासलगाव स्थानकात ‘कांदा...

0
लासलगाव | वार्ताहर | Lasalgoan देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये प्रति किलोवर पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) बफर स्टॉकमधून...