राहुरी । तालुका प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार, जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या तीन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी आज, शनिवारी (दि. २० डिसेंबर) सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी नगरपालिका आणि नेवासा नगरपंचायतीचा समावेश असून मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
निवडणूक प्रक्रियेचा आढावा जिल्ह्यातील या महत्त्वाच्या चार स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच इतर सात नगरपालिकांमधील रिक्त असलेल्या १२ नगरसेवक पदांच्या जागांसाठीही आज पोटनिवडणूक पार पडत आहे. न्यायालयीन पेच आणि तांत्रिक कारणांमुळे या ठिकाणच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आज होणाऱ्या मतदानामुळे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या भागातील राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी दुपारपर्यंत लक्षणीय हजेरी लावली. प्राप्त माहितीनुसार, दुपारी १:३० वाजेपर्यंत येथे ३३.४३ टक्के इतके मतदान झाले आहे. एकूण २३,८५७ मतदारांपैकी ७,९७३ जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये ४,३४४ पुरुष तर ३,६२९ महिला मतदारांचा समावेश आहे.
कडक पोलीस बंदोबस्त मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्वच केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळच्या सत्रात थंडीचा प्रभाव असूनही मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. प्रशासनाकडून मतदानासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे.




