सटाणा | प्रतिनिधी Satana
शहरात येत्या १५ डिसेंबरपासून देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने यात्रा समितीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी येथील मंदिरात पहाटे महापूजा, दुपारी रथ मिरवणूक तसेच विविध कार्यक्रम संपन्न होणार असून दरवर्षीप्रमाणे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी पहाटे चार वाजता बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे व प्रतिभा चावडे, मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील व स्वप्निल पाटील तसेच देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड व अरुणा बागड आदींच्या हस्ते देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिरात महापूजा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता पोलीस उपअधीक्षक यशवंत बाविस्कर, पोलीस निरीक्षक योगेश पाटील आदींसह पोलीस विभागाचे अधिकारी, सेवक तसेच इतर पदाधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत रथ मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.
पंधरा दिवसांच्या कालावधीत यात्रोत्सव काळात अन्नदान, कुस्ती दंगल, दहीकाला व कीर्तन असे विविध कार्यक्रम संपन्न होणार असून, नुकतेच झालेल्या यशवंत लीलामृत परायण सोहळा भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यात्रोत्सवात पाळणे, हॉटेल्स इतर विविध दुकाने थाटण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.





