Wednesday, December 4, 2024
Homeशब्दगंधअनुभवाचसिंचित धाडसाने उकल करणारे आत्मकथन ‘धाडस’

अनुभवाचसिंचित धाडसाने उकल करणारे आत्मकथन ‘धाडस’

– डॉ.मिलिंद बागुल

मानवी समाजात नवनव्या विचारांची पेरणी करताना उगवणार्‍या किंवा येणार्‍या विचारांच्या पिकांची परवा निश्चितपणे करणे अपेक्षित आहे अन्यथा समाज दोलायमान, विचारहीन, क्रूर, वाईट, वेळप्रसंगी घातक देखील होऊ शकतो यासाठी आपल्या शिक्षणाचा अनुभवाचा आणि त्यातून चांगल्या अर्थाने समाजाच्या जडणघडणीत आपल्या योगदानाचा देखील विचार होणे गरजेचे वाटते.

- Advertisement -

माझा अनुभव, त्या अनुभवाची मांडणी झाली पाहिजे समाजापर्यंत तो अनुभव गेला पाहिजे प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढीत नवा आशावाद, नवं जीवन घडविण्याचा अनुभव पुढच्या पिढीसाठी किती समृद्ध असू शकतो हे सर्व अर्थाने जाणवणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच लिहिलं पाहिजे असा विचार करीत आपल्या अनुभवाचे संचित लेखणीच्या माध्यमातून वाचकांसाठी लिहीत डॉ.के.के.मोरे यांनी धाडस या अथर्व पब्लिकेशन ने प्रकाशित केलेल्या आत्मकथनातून आपल्या जीवनानुभवाची मांडणी केली आहे.

शिक्षणातून जीवन विकासाकडे मार्गक्रमण करणार्‍या पिढीतल्या अनेकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या आणि पुढच्या पिढीच्या वाटा समृद्ध केल्यात, अशा पिढीतल्या ग्रामीण भागातील एक नाव म्हणजे डॉ.के.के.मोरे होय. आपल्या शालेय जीवनापासून परिस्थितीशी झगडा, लढा देत स्वतःला कुटुंबाला उभ करण्याचा प्रयत्न करीत एक इतिहास घडवला आपल्या शालेय जीवनात केंद्रात गुणवत्ता यादीत तिसरा येऊन आपल्या खेड्याचा परिसराचा नावलौकिक केला. ही गुणवत्ता सिद्ध करीत आपली शैक्षणिक वाटचाल सुरूच ठेवली त्यांच्या शालेय जीवनातील संघर्षमय आठवणी मांडताना त्यांनी वर्गमित्रांच्या कौटुंबिक परिस्थितीचे अवलोकन करत असताना घर, गाव सोडून शिक्षणासाठी होस्टेलमध्ये वसतिगृहात राहण्याचा अनुभव कथन केला आहे. बी.जे.मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाल्यानंतर काही चांगले तर काही वाईट अनुभवानी त्यांना जे शिकायला मिळालं ते परिस्थितीनुरूप सामाजिकतेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या अनुभवातून वाटचाल करत करत आपल्या जीवनाचा प्रवास ते समृद्ध वाटेकडे नेत होते. काही प्राध्यापक अतिशय मन लावून शिकवणारे तर काही प्राध्यापक सडलेल्या, किडलेल्या मानसिकतेचे की ज्यांच्या डोक्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांविषयी सतत भेदभावाची विचारधारा पोसली जात होती आणि यातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा जो संताप व्हायचा तो मांडताना वास्तवता मांडत त्या काळातील विद्यार्थी हा स्वाभिमानी आणि अभ्यासू असा होता हे जाणीवपूर्वक लेखक आत्मकथनात मांडतात. आपल्या शालेय जीवनापासून सोसावे लागणारे जातीयतेचे चटके हे बरेच काही धडे देऊन गेलेत. शिक्षणातून होत जाणारा बदल नव्या आयुष्याची जडणघडण करीत होता आणि ह्या जडणघडणीतून कुटुंबाचा बदलत जाणारा नवनवीन विचार प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा होता. शालेय जीवनातले सदाशिव गोपाळ मंडलिक सरांचा व्यक्तिमत्त्वावर असणारा प्रभाव तर मोरे सर, थोरात सर, ब्राह्मणे सर यांचा अजूनही असणारा लळा ही खर्‍या अर्थाने असणारी शालेय जीवनातील आठवण महत्त्वाची आहे. लेखक आपल्या जीवनाच्या जडणघडणीत असणारे शिक्षकांचे स्थान खर्‍या अर्थाने प्रामाणिकपणे मांडतात. महाविद्यालयीन जीवनात गाव आणि घर सोडावं लागलं मेस मधील जेवण आणि सारच मेडिकल कॉलेजच वातावरण वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवायला मिळत असल्याचे मांडतात. आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी वाटचाल निश्चितपणे सुरू झाल्याची हमी लेखकाला वाटत होती.

संघर्षातून व्यक्तिमत्त्वाची असणारी जडणघडण निश्चितपणे जीवनाला दिशा देणारी ठरत असते याचा प्रत्यय लेखकाला आला त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात घेतलेली मेहनत भविष्यात त्यांच्या कुटुंबाची गरिबी, दारिद्य्र ज्ञानाच्या बळावर दूर करणारे ठरले आहे त्यांनी मिळवलेल्या, प्राप्त केलेल्या ज्ञानातून नोकरीत त्यांनी दिलेली गोरगरिबांसाठीची सेवा महत्त्वाची वाटते आदिवासी भागात गोरगरीब वस्तीत आपल्या बांधवांना आरोग्याच्या दृष्टीने दिलेले उपचार असतील, शासनाचा विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा केलेला प्रयत्न असेल तो महत्त्वाचा असाच आहे समाज आणि सरकार या दोन गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत की मानवी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता सरकारमध्ये चांगला उद्देश ठेवून आपल्या समाज विकासाच्या ध्यास घेणारी माणसं समाज हित जोपासत असतील तर निश्चितपणे एक चांगल्या योजना त्यातून साकारता येतात परंतु विकासाच्या ऐवजी आपल्या पिढीचा स्वार्थ साधणारी माणसं सरकारमध्ये आली तर ते मानवी समाज व्यवस्थेला भकास करण्याचा प्रयत्न करतात यामुळे जे चित्र बदलत जाते ती वास्तवता लेखक धाडसाने आपल्या आत्मकथनात मांडतात. समाजाला दिशा देण्याऐवजी समाजाची दिशाच भरकटण्यासाठी इथल्या व्यवस्थेतील माणसांची चाललेली स्पर्धा निश्चितपणे समाज विघातक, देशविघातक असल्याची खंत लेखक व्यक्त करतात. अनुभव कथनासोबतच चांगले वाईट प्रसंग मांडण्याचे धाडस डॉ.के.के.मोरे यांनी आत्मकथनात केले आहे, एक अनुभव लिहितांना त्यांनी लिहिले की सिन्नर तालुक्यातल्या वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला तत्कालीन प्रधानमंत्री राजीवजी गांधी यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी असलेल्या स्त्रियांशी ते संवाद साधतात ते त्यांना प्रश्न विचारतात की, आपको कुछ मिलता है क्या, अनाज, काम, पाणी मिलता है क्या? घोळक्यातली एक बाई म्हणते, साब कुछ नही मिलता हम गरीबोको. त्यांच्यासोबत जात राजीवजी फुटक्या रांजणात हात टाकत ओंजळीत पाणी दाखवत यही पाणी पीते हो आप? हा साहब हम यही पानी पीते है चार चार दिन पाणी नही आता गरीब को घर भी नही मिलता ऐसेही रहते है हम. सारा संवाद सुन्न करणारा सारे अधिकारी हा संवाद ऐकत होते, मुख्यमंत्री सुन्न आणि खिन्न. तात्काळ राजीवजीन्नी जबाबदार सर्व अधिकार्‍यांवर कारवाईचे आदेश दिलेत.त्यावेळी कवी कुसुमाग्रजांची राजा आला ही कविता खूप गाजली हा व्यवस्थेतला अनुभव महत्त्वाचा असाच आहे. तळागाळातल्या उपेक्षित, वंचित अशा घटकांपर्यंत भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुरूप त्यांचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी जे प्रयत्न केले गेले पाहिजे ते होत नाही राजकीय असो की शासकीय यंत्रणा असो कशा पद्धतीने जनतेच्या असणार्‍या समस्या, प्रश्न यांच्यात अधिकाधिक भर टाकत जीवाशी कशी खेळत असते हे वास्तव धाडस आत्मकथनात लेखक लिहितात. सत्ता आणि पैसा हे सूत्र राजकीय आणि शासकीय यंत्रणेने आपले ब्रीद ठरवीत देशाशी बेईमानी चालवलेली आहे त्याचा पर्दापाश करणारे आत्मकथन नव्या पिढीला, वाचकाला जागृत करणारे असेच आहे. लेखक स्वतः शासकीय सेवेत त्याकाळी असल्याने त्यांना आलेले अनुभव अश्या यंत्रणेला त्यांनी वेळप्रसंगी केलेला विरोध आणि यामुळे त्यांना झालेला त्रास हा देखील त्यांनी सुस्पष्टपणे मांडलेला आहे. यंत्रणा इतकी आळशी झालेली आहे की त्यांना सामान्य माणसांच्या अडचणीशी काही देणे घेणे नाही हे लक्षात येते. आत्मकथनात अनेक प्रसंगातून लेखकाने जे मांडले आहे त्यातून त्या काळातल्या आणि आजच्या ही काळात फार काही बदल झालेला आहे असे वाटत नाही. आपल्यातला प्रामाणिकपणा गोरगरीब, वंचित, उपेक्षित समाज व्यवस्थेला न्याय मिळवून देण्यासाठी आपला चाललेला सततचा प्रयत्न काही मंडळी हाणून पाडण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यासोबतच काम अधिकाधिक कसे क्लिष्ट, अडथळ्याचे होतील यासाठी कार्यरत असतात.

शासकीय सेवेत त्यातल्या त्यात आरोग्य सेवेत कार्यरत असल्यामुळे जे काही चांगले करता येईल ते करण्याच्या प्रयत्नाबरोबरच लेखक डॉ. के. के. मोरे यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि समाजशील वृत्तीमुळे अनेक सामाजिक कार्यात त्यांचा असणारा सहभाग त्यांना समाधान देणारा असायचा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातून नव्या विचारांची देवाण-घेवाण करत आपल्या ज्ञाती बांधवांशी नाती जोपासत समाज मनाला आपलेस करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.सामान्यातल्या सामान्य, वंचित, उपेक्षित, आदिवासी अशा सर्व समाज घटकाला आरोग्याच्या दृष्टीने असणार्‍या शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा चाललेला प्रयत्न खर्‍या अर्थाने किती यशस्वी करणारा होता हे त्यांनी अनुभवातून लिहिलं आहे.

धाडसाने लिहिलेलं धाडस हे आत्मकथन जळगावच्या अथर्व पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. आत्मकथनाचे मुखपृष्ठ आपल्या जीवनानुभवाच्या मांडणीचे चेहर्‍यावरील भाव व्यक्त करीत असल्याचे लक्षात येते हे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार फाय फाउंडेशन पुरस्कार प्राप्त चित्रकार श्रीधरदादा अंभोरे यांनी रेखाटले आहे. प्रख्यात समीक्षक, जेष्ठ कवी राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी प्रस्तावना लिहिली असून त्यांनी प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे डॉ.के.के.मोरे या संवेदनगर्भ डॉक्टरांची ही आत्मकथा म्हणजे संघर्ष गाठीशी असलेल्या प्रवाहाचे प्रतिनिधित्व करते. खडतर जीवन जगत वैद्यकीय क्षेत्रात संपादन केलेल्या यशाच्या नाना खुणा डॉ. मोरे यांच्या आत्मकथेची प्रधान ओळख ठरावी हे वास्तव आणि समर्पक असे आहे. भारतीय साहित्य क्षेत्रातलं महत्त्वपूर्ण असं नाव जेष्ठ कवी लोकनाथ यशवंत यांनी आत्मकथनाला लिहिलेली पाठराखण लेखकाच्या धाडसाला सर्वश्रुतता आणून देते.ते लिहितात सगळे बांधव हतबल होऊन जातात अशावेळी डॉ. के.के. मोरे सारखे फरिस्ते आशेचा किरण होऊन जातात. ही समाज निरीक्षणे धाडस आत्मकथनाला समृद्ध करतात. लेखक डॉ.के.के.मोरे यांच्या विचार वाटेला लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा.

– जिल्हाध्यक्ष, सत्यशोधकी साहित्य परिषद जळगाव.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या