मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून बीडमधील गुन्हेगारी प्रकरणं बाहेर काढल्यामुळे भाजपाचे आमदार सुरेश धस चांगलेच चर्चेत आहे. दोन महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे आणि त्यांना अडचणीत आणणारे सत्तापक्षाचेच आमदार सुरेश धस यांच्यात समेट झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या दोघांची गुप्तपणे भेट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चा सुरु झाली आहे. याबाबत सुरेश धस यांनी भेट झाल्याचे मान्य करत स्पष्टीकरण दिले आहे.
याबाबत आमदार सुरेश धस म्हणाले, माझी आणि धनंजय मुंडे यांची परवा त्यांच्या निवासस्थान भेट झाली. त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांच्या तब्बेतेची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. त्यात काही गैर नाही. या विषयात गजब करण्यासारखे काहीच नाही. त्यांचे ऑपरेशन झाले. त्यामुळे परवा भेटलो. कोणाच्या तब्बेतेची चौकशी करणे यामध्ये काही गैर नाही. आमचा लढा सुरुच राहणार आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत अजून काही नवीन घडामोडी होणार आहे. त्यानंतर मी सर्व काही सांगणार आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
धनंजय मुंडे यांचे ऑपरेशन झाले होते. दोन दिवसांपूर्वी रात्री दवाखान्यात दाखल केले आहे, दुसऱ्या दिवशी, झाकून लपून नाही. दिवसा मी त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. फक्त एवढेच काय ते घडले होते. त्यांची भेट आणि लढा हा वेगळा आहे. लढा हा सुरूच राहणार आहे. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो त्यात चर्चा करण्याची गरज काहीही नाही. बावनकुळे यांची आणि माझी आता भेट झाली. धनंजय मुंडे आणि माझी साडे चार तास अशी भेट झाली नाही. बावनकुळे जर असे काही म्हटले असतील तर त्यांना विचारा. मुळात धनंजय मुंडे यांच्या भेटीची आणि लढ्याची काहीच संबंध नाही. रात्री धनंजय मुंडे यांना दत्ता भरणे यांनी रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे मी फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. ही परवाची गोष्ट आहे, असे सुरेश धस यांनी सांगितले.
दरम्यान, या भेटीबाबत धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले असून ते म्हणाले, “मी कुणालाही भेटलेलो नाही. डोळ्याच्या सर्जरीमुळे मी विश्रांती घेत होतो. काल मी पहिल्यादा अजित पवार यांना भेटलो. त्या व्यतिरिक्त मी कुणाचीही गुप्त भेट घेतलेली नाही” असं धनंजय मुंडे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा