मुंबई । Mumbai
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या पाठोपाठ आता युवती विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संपूर्ण लोकसभा निवडणुकीत धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी पक्षापासून अंतर राखल्याची चर्चा होती. आता मुंबईतील गरवारे क्लब येथे सोमवारी पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोनिया दुहान या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत होत्या. पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम केले आहे.
पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या सक्रिय झाल्या होत्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या. सोनिया दुहान यांनी हॉटेलमध्ये जात अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवक आघाडीचे अध्यक्ष धीरज शर्मा यांची पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. धीरज शर्मा यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. फेसबुकवर पोस्ट करून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.