Thursday, May 2, 2024
Homeधुळेशिरपुरात भरदुपारी चोरट्यांचा धिंगाणा

शिरपुरात भरदुपारी चोरट्यांचा धिंगाणा

शिरपूर (Shirpur)। प्रतिनिधी

शहरातील शंकर पांडू माळी नगरातील वनपालाकडे आज भरदुपारी चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. एक लाख रुपये रोख व दागिने असा ऐवज चोरुन नेला. चोरी सुरु असतांनाच घरमालकाचा मुलगा आल्याने चोरट्यांनी त्याच्यावर हल्ला करुन आणि ऐवज घेवून त्यांनी पोबारा केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

बोराडी (Boradi) येथील वनविभागात कार्यरत असलेले वनपाल प्रकाश हरी माळी यांचे शंकर पांडू माळी नगरमध्ये निवासस्थान आहे. ते कर्तव्यावर गेले होते. तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य धुळे येथे कार्यक्रमासाठी गेले होते. मुलगा अनुज हा घरी होता. तो दुपारी दीडला जेवण करण्यासाठी बाहेर गेला. घरी कोणी नसल्याची संधी साधून तीन संशयितांनी तेथे घरफोडीचा डाव रचला. दोन जण मोटार सायकलजवळ थांबून बाहेर पहारा देत राहिले. तर एकाने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर हत्याराने उघडून तेथील दागिने व लाकडी कपाटातून एक लाखांची रोकड व दोन कोरे बिन सह्यांचे चेकही चोरून नेले.

चोरी सुरु असतांना जेवण आटोपून अनुज माळी घरी परतला. त्याच्या दुचाकीचा आवाज ऐकून घरातील चोरटा बाहेर पडला. तो नेमका अनुजच्या समोर पोहचला. त्याने अनुजला साहेब घरात बसले आहेत, असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु अनुज स्वत: घराला कुलूप लावून बाहेर पडला असल्याने त्याचा चोरट्यांवरील संशय बळावला. त्याने बाहेर येणार्‍या चोरट्याला लाथ मारली. चोरट्याने आरोळी देताच त्याचे साथीदार येऊन पोहचले. तिघांनी अनुजला मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी मोटारसायकलवरुन पोबारा केला.

त्यानंतर अनुजने वडिलांना फोन करुन चोरीबाबत माहिती दिली. वनपाल प्रकाश माळी घरी आले. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसही घटनास्थळी पोहचले. त्यांनी परिसरात चौकशी करुन काही दुकानांवरुन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.

मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या वेषात चोरटे

संशयित विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर आले असून त्यांनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ( Marketing Executive) प्रमाणे कपडे परिधान केले होते. संशयितांकडे लॅपटॉप बॅग्ज होत्या. तिघांचे वय 30 ते 35 वर्षाच्या दरम्यान असल्याची माहिती अनुज माळी याने दिली. कॉलनी परिसरात वेगवेगळे वेष घेऊन बंद घरांची टेहळणी करणारी टोळी सक्रीय असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या