Sunday, May 19, 2024
Homeधुळेहोम क्वॉरनटाईन रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करा !

होम क्वॉरनटाईन रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करा !

धुळे – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गृह विलगीकरणातील बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करीत पायाभूत सोयीसुविधांसह चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य पथकाचे सदस्य डॉ. राम प्रताप सैनी यांनी आज येथे दिले.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य पथकाचे सदस्य डॉ. सैनी यांच्यासह डॉ. एस. के. साधूखान धुळे जिल्हा दौर्‍यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

डॉ.सैनी म्हणाले, कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर गृहविलगीकरण केलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे.

तेथे आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याबरोबरच चाचण्यांची संख्या वाढवावी. त्यात आरटीपीसीआर चाचण्या सर्वाधिक कराव्यात. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही वाढवावा, असेही त्यांनी निर्देश दिलेत.

रुग्ण संख्येचा वाढता दर पाहता कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटलमधील खाटांची संख्या वाढवावी.

त्याबरोबरच ऑक्सिजनयुक्त बेडची संख्या वाढवावी. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवावे. नागरिकांना मास्क लावण्यासह राज्य शासनाच्या नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करावे.

डॉ.साधूखान म्हणाले, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. लक्षणे दिसून येणार्‍या रुग्णांची रॅपिड अँटिजन चाचणी निगेटिव्ह आली, तर त्याची आरटीपीसीआर चाचणी करावी.

घरोघरी भेट देवून नागरिकांची तपासणी मोहीम राबवावी. कोविड रुग्णांसाठी उपाययोजना करतानाच लसीकरण मोहीम व्यापकस्तरावर राबवावी. कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या मृत्यूचे विश्लेषण करण्यात यावे. तसेच चाचणीचा अहवाल 24 तासांत मिळेल, असे नियोजन करावे, असेही डॉ. साधूखान यांनी सांगितले.

तसेच पहिल्या लाटेत जिल्हा प्रशासनाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल आरोग्य पथकाच्या सदस्यांनी घेतली. त्याप्रमाणेच यावेळीही कामगिरी पार पाडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे मृत्यूदर कमी असून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागाच्या माध्यमातून 24 तास कार्यरत कोविड कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तालुकास्तरावर ऑक्सिजनयुक्त बेड तयार करण्यात आले असून तालुकास्तरावर ऑक्सिजन टँक प्रस्तावित आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या माध्यमातून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक प्राथमिक आणि उपकेंद्रस्तरावर लसीकरणास सुरवात झाली आहे. पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी सांगितले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस दलातर्फे कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.

विना मास्क आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त श्री. शेख यांनी दिली. करोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील कोविड 19 स्थितीची माहिती दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माणिक सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांच्यासह कोरोनाचे सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या