धुळे –
शिरपूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका प्रभारी डॉ. जितेंद्र युवराज ठाकुर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला असून ते दि. 12 डिसेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये समर्थकांसह प्रवेश करणार आहेत.
त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार आहे. तसेच जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळकटी मिळणार आहे. आगामी जि.प, पं.स निवडणुकीत याचा राष्ट्रवादीचा फायदा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने डॉ. जितेंद्र ठाकुर नाराज झाले. त्यामुळे त्यांनी पद आणि पक्षाचा राजीनामा देवून अपक्ष उमेदवारी केली. त्यानंतर आगामी जि.प, पं.स निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी विकास आघाडीची घोषणा केली.
त्यामुळे डॉ. ठाकुर कोणत्या पक्षात जातील, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. अखेर त्यांनी समर्थकांच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा कल व वरिष्ठांशी चर्चा करून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहिर केले.
त्यानुसार डॉ. जितेंद्र ठाकुर हे दि. 12 डिसेंबर रोजी निवडक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तथा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.
डॉ. ठाकुर यांना राष्ट्रवादीकडून पद देखील मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार असून जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह शिरपूर पंचायत समितीच्या निवडणुकीत रंगत येणार आहे.