श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा बस आगारामध्ये डिझेल तुटवडा झाल्याने मागील पंधरा दिवसांपासून एसटीच्या फेर्या कमी झाल्या असल्याने अनेक एसटी बसेस आवारात उभ्या आहेत. यामुळे प्रवाशी, शालेय विद्यार्थी यांची गैरसोय झाल्याचे लक्षात येताच टिळक भोस यांनी व त्यांच्या सहकार्यांनी भर बाजारच्या दिवशी श्रीगोंदा बस आगाराच्या गेटला टाळे ठोकून आंदोलन केले.
श्रीगोंदा एसटी आगारात मागील पंधरा दिवसांपासून डिझेल तुटवडा झाल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फेर्या बंद झाल्या तर जवळच्या गाड्यांच्या फेर्या कमी झाल्याने प्रवासी, शालेय विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली. एसटी आगारास डिझेल पुरवठा वेळेवर होत नसल्याने कर्मचारी, प्रवासी यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यावेळी प्रवाशांची होणारी अडचण लक्षात घेऊन भोस यांनी श्रीगोंदा एसटी आगाराच्या मुख्य गेटला कुलूप लावत आंदोलन केले.
यावेळी सतीश बोरुडे, युवराज पळसकर, सद्दाम पठाण, दिगंबर भदे उपस्थित होते. यावेळी श्रीगोंदा आगर व्यवस्थापक संदीप ढवळे यांनी दीड ते दोन तासांत डिझेल टँकर येणार असल्याने बस सेवा सुरळीत होतील, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्ह्यात डिझेलचा प्रश्न
एसटी महामंडळाचा डिझेलचा विषय हा एकट्या श्रीगोंदा तालुक्यापुरता मर्यादित नसून जिल्ह्यात अनेक आगारांत एसटीच्या गाड्यांना डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे ऐनसणासुदीच्या काळात नागरिकांचे हाल होत आहे. एसटीच्या फेर्यावर वेळेवर होत नसल्याने सवलत असतानाही अनेकांना खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.
वेळापत्रक कोलमडले
जिल्ह्यात अनेक आगारांत एसटी महामंडळाच्या नियोजित एसटी बसेसचे वेळपत्रक दररोज कोलमडताना दिसत आहे. विशेष करून दुपारच्या टप्प्यात आणि सांयकाळच्यावेळी अचानक नियोजित गाड्या रद्द अथवा उशीराने धावत आहेत. रात्रीच्या मुक्कामाच्या गाड्या कशा वेळेवर सुटतात, असा प्रश्न नागरिकांना आहे. यामुळे एसटी प्रशासनाने याची दाखल घेऊन जिल्ह्यात दिवसभर नियोजित वेळेत बसेस मार्गस्थ कशा होतील याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.