वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
वाहनातून डिझेलची चोरी (Diesel Theft) करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानीक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी जेरबंद केला असून त्यांच्या ताब्यातून 3 लाख 37 हजार 320 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने वैजापूर व शिल्लेगाव हद्दीत गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. बाळू दगडूबा खिल्लारे, विलास पंढरीनाथ, सुनिल बाबासाहेब गायकवाड, गणेश गजानन नेमाडे असे अटक (Arrested) केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या टोळीने मोहमद आफताब अजगर (उत्तर प्रदेश) या चालकास समृद्धी महामार्गावर गाडी उभी असताना लाकडी दांडयांने व हत्याराने मारहाण (Beating) करून रोख रक्कम हिसकावून वाहनातून निघून गेले. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच गजानन ज्ञानेश्वर पुंडे (रा. कळसा ता. डिग्रस जि. यवतमाळ), हे चालक समृध्दी महामार्गावर जांबरगांव शिवारात गाडी बाजूला लावून झोपले असता चोरटयांनी त्यांच्या गाडीतील 240 लिटर डिझेल व साहित्य चोरून नेले होते.ही चोरी सुद्धा याच टोळीने केल्याचे निष्पन्न झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (LCB Police) या टोळीला गजाआड केले.त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. रात्रीच्या वेळी उभ्या वाहनातील डिझेलची चोरी करत असल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील गाडी, मोबाईल, रोख रक्कम असा मुद्देमाल पोलीसांनी जप्त (Seized) केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस अंमलदार रवि लोखंडे, शिवानंद बनगे, अशोक वाघ, योगेश तरमाळे, जीवन घोलप, चालक निलेश कुडे यांनी केली