अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली देशभरात उभ्या ठाकलेल्या ऑनलाईन फसवणुकीतील संशयित आरोपींचे धागेदोरे आता थेट अहिल्यानगरपर्यंत पोहोचले आहेत. येथील सायबर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत डिजिटल अरेस्ट प्रकारातील 8 लाख 80 हजारांची फसवणूक उघडकीस आणत तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. पारनेर, नेवासा तालुक्यातील दोघांचा यामध्ये समावेश आहे. या आरोपींची बँक खाती फसवणुकीसाठी वापरल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
विजय रंगनाथ चेमटे (रा. भाळवणी, ता. पारनेर), अभिजित अजिनाथ गिते (रा. दादेगाव, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. नर्हे, पुणे) व अक्षय संजय तांबे (रा. सलाबतपूर, ता. नेवासा, हल्ली रा. हिजवडी, पुणे) अशी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. संदीप कुलथे (रा. सावेडी, अहिल्यानगर) यांना मुंबई सायबर सेलमधून बोलत आहोत असे सांगून मनी लॉन्ड्रिंग, हवाला आणि आयडेंटिटी थेफ्ट प्रकरणात डिजिटल अटक करण्याचे खोटे भय दाखवत 24 ते 28 ऑक्टोबर 2025 दरम्यान व्हिडीओ कॉल व विविध मोबाईल नंबरवरून धमकावण्यात आले. त्यातून कुलथे यांच्या तब्बल 8 लाख 80 हजार रूपये उकळण्यात आले. यांसदर्भात कुलथे यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात 31 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्याद दिली होती.
फिर्याद दाखल होताच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. यामध्ये उपनिरीक्षक सुदाम काकडे, अंमलदार मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, उमेश खेडकर, निळकंठ कारखेले, रावसाहेब हुसळे, अमोल आव्हाड यांचा समावेश होता. या पथकाने तांत्रिक विश्लेषण, नंबर ट्रेसिंग, डिजिटल ट्रेल्स यांचा आधार घेत पथकाने तीन जणांना जेरबंद केले. अटक आरोपींकडून चौकशीदरम्यान महत्त्वाचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून फसवणुकीत वापरलेली त्यांची बँक खाती तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.
या खात्यांतून मोठ्या प्रमाणात संशयास्पद व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पुढील चौकशीत अजून मोठे नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची (29 नोव्हेंबरपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान नागरिकांनी अनोळखी कॉल, लिंक, ओटीपी किंवा स्वत:ला पोलीस/सरकारी अधिकारी सांगणार्या व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका. फसवणूक झाल्यास तातडीने सायबर हेल्पलाईन 1930/1945 किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.




