अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात राहणार्या एका महिला डॉक्टरला डिजिटल अरेस्ट (अटक) करून तिची तब्बल 10 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या पीडित महिला डॉक्टरने या प्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दोन मोबाईल नंबर धारक अज्ञात व्यक्तीविरूध्द गुरूवारी (7 नोव्हेंबर) सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना 28 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळेत घडली आहे. डिजिटल अरेस्टच्या प्रकरणात फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर अनोळखी मोबाईल नंबर धारक व्यक्तीने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल केला व त्यांना 10 लाख 26 हजार रुपये बँक खात्यात टाकण्यास भाग पाडले आहे. 28 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास फिर्यादी महिला त्यांच्या घरी असताना त्यांना एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. तो फोन करणारा व्यक्ती म्हणाला, ‘मी दिल्ली क्राईम ब्रँच मधून बोलतोय.
तुमचा मोबाईल नंबर चाईल्ड पोेर्नोग्राफीमध्ये वापरण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्याविरूध्द नोटीस काढण्यात आली आहे. तुम्हाला जर हे प्रकरण मिटवायचे असेल तर आम्हाला सांगा’. त्यावर फिर्यादीने प्रकरण मिटविण्यासाठी संमती दिल्याने त्या व्यक्तीने तुमचा कॉल ‘सीबीआय’ ला ट्रान्सफर करतो असे सांगितले. फिर्यादीला 11 वाजता एका अनोळखी मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल आला. व्हिडीओ कॉलवर बोलणारी व्यक्ती पोलीस गणवेशात पोलीस ठाण्यात बसलेली दिसत होती. ती व्यक्ती फिर्यादीला म्हणाली, ‘तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी झाला आहे. तसेच तुमचे आधार कार्ड व मोबाईल नंबरचा वापर करून संदीप कुमार या नावाने बँकेत अकाउंट ओपन केलेले आहे. त्यावर खूप मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी असून सदर व्यक्ती हा फरार आहे. त्यामुळे सदर घटनेस आपण जबाबदार आहे. तुम्हाला जर हे प्रकरण मिटवायचे असेल तर तुम्ही तुमच्या बँकेचे सेव्हिंग आम्हाला द्या, त्याची आम्ही पडताळणी करू की सदर रक्कम ही मनीलॉन्ड्रींगची आहे की नाही.
तुम्ही सदर बाबत कोणाशी संपर्क केला तर तुमचे लायसन्स रद्द होवून तुमच्या विरूध्द नॉन बेलेबल गुन्हा दाखल होईल तसेच तुमचे पती आणि वडिल यांना कळविले तर त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल होवून त्यांचे बँक अकाऊंट देखील फ्रिज होतील’ अशी धमकी दिली. समोरच्या व्यक्तीने त्यांना व्हिडीओ कॉल चालू ठेवण्यास सांगितले. त्याने सांगितलेल्या बँक खात्यावर फिर्यादीने सुरूवातीला पाच लाख 26 हजार व नंतर पाच लाख रुपये पाठविले. तुम्ही डिजिटल अटक असून तुम्ही कोणाशीही संपर्क करू शकत नाही असे सांगून सायंकाळी सहा वाजेपर्यंत व्हिडीओ कॉल सुरू ठेवला व नंतर कॉल कट करून टाकला. सदरची माहिती फिर्यादीने त्यांच्या पतीला दिली. आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी येथील सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी त्या अर्जाची चौकशी करून 7 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम अधिक तपास करत आहेत.
जिल्ह्यातील पहिलीच घटना
डिजिटल अरेस्टचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. राज्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र जिल्ह्यात ही पहिलीच घटना घडल्याची फिर्याद सायबर पोलिसांकडे दाखल झाली आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या फोनला प्रतिसाद न देता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.