दिंडोरी
दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेद्वार सुनीताताई चारोस्कर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहुन प्रत्येक गावांमध्ये जात जनतेला प्रबोधन करत आपल्या मानस कन्येला विजयी करण्यासाठी 77 वर्षीय योध्दा श्रीराम शेटे नावाचे वादळं सध्या गावोगावात घोंगावत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मतदार संघात श्रीराम शेटे यांना मानणारा वर्ग मोठा असल्याने गावागावातील प्रचार सुनीताताई चारोस्कर यांच्या विजयासाठी अनुकूल वातावरण तयार करणारे ठरत आहे. त्यामुळे श्रीराम शेटेंच्या नावाने विरोधक धास्तावल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या विश्वासू आणि निकवर्तीयापैकी प्रमुख नावात श्रीराम शेटे यांचे नाव घेतले जाते. शरदचंद्र पवारांना नाशिक जिल्ह्यात कोणताही घ्यायचा असेल तर श्रीराम शेटे यांच्या मताचा विचार प्रामुख्याने घेतला जातो, हे सर्वश्रृत आहे. बारामतीनंतर सर्वात सुरक्षित मतदार संघ म्हणून दिंडोरीचा उल्लेख शरद पवार करतात. त्याप्रमाणे श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली 2009 चा निसटता पराभव वगळता पक्ष स्थापनेपासून दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर साहेबांवर निष्ठा कायम ठेवून दादांच्या गटात सामील होण्याचे श्रीराम शेटे यांनी टाळले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणूकीतही श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी लोकसभा मतदार संघामध्ये विजयाची तुतारी फुंकली गेली. भास्कर भगरे सारख्या सर्व सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याला खासदारकीचा मान मिळाला.
आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी अशी निवडणूक होत आहे. दादा गटात नरहरी झिरवाळ गेल्यामुळे आता गुरुस्थानी असलेल्या शेटे साहेबांचे पाठबळ झिरवाळांच्या मागे नाही. याउलट आपली मानस कन्या म्हणून परिचित असलेल्या तसेच जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती म्हणून जिल्ह्यात नावलौकीक मिळविलेल्या उच्च शिक्षित उमेद्वार सुनीता रामदास चारोस्कर यांच्या मागे खंबीरपणे शेटे उभे राहिले आहे. सुनीता चारोस्कर यांच्या प्रचाराची धुरा स्वत: साभाळत आपले गुरु शरदचंद्र पवार यांना दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघामध्ये विजयी होेण्याचा शब्द श्रीराम शेटे यांनी दिला आहे. त्यानुसार प्रचारामध्ये स्वत: आघाडी घेवून तरुणांनाही लाजवेल अशी भरारी श्रीराम शेटे यांनी घेतली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना उभारी मिळाली असून श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघात विजयाची तुतारी आपणच फुंकू असा विश्वास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
आतापर्यंतच्या इतिहासामध्ये श्रीराम शेटेंशिवाय कुणालाही विजय मिळवता आला नाही. ‘जिकडे शेटे तिकडे विजय’ असे समीकरण असल्याचा इतिहास आहे. तो इतिहास यंदाही कायम राहील, यात शंका नाही. दुसर्यावर टीका करण्यापेक्षा आपण किती सक्षम आहोत हे जनतेला पटवून देण्यातच खरा विजय असतो, हे शेटेंच्या कृतीतून कळते. आपल्या प्रचारसभेत शासनाच्या ध्येयधोरणांवर दृष्टीक्षेप करुन जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम श्रीराम शेटे यांच्या माध्यमातून केले जाते. हे जनतेला भावले असून महाविकास आघाडीच्या उमेद्वार सुनीताताई चारोस्कर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
श्रीराम शेटेंची ‘निष्ठा’ धनशक्तीला पराभूत करणार
श्रीराम शेटे यांचा जन्म 5 डिसेंबर 1946 चा असून 77 वर्षाचा योध्दा दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघामध्ये शरदचंद्र पवार यांंचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी विजयाची तुतारी फुंकण्यासाठी सज्ज झाले आहे. रात्री उशिरापर्यंत प्रचार करत घरी पोहचणे आणि सकाळी पुन्हा पहाटे 5 वाजता नियमित उठतात. त्यानंतर जवळपास दीड तास ‘योगासने’ करतात. त्यानंतर धावण्याचा देखील व्यायाम करुन सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ बसतात. सर्व कामे आवरत सकाळी 7 वाजता घरातून जेवणाचा डबा घेऊन पुन्हा प्रचारासाठी रवाना होतात. दुपारी 12. 30 वाजता जेवण करतात व अधुनमधून ताक पितात, असा त्यांचा दिनक्रम सुरु आहे. प्रत्येक गावात जावून उमेद्वाराच्या प्रचार सभेत जनतेला उद्बोधन करत 77 वर्षीय शरद पवारांचा निष्ठावंत योद्धा आज दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघामध्ये प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांना उभारी देत आहे. श्रीराम शेटे यांच्यापुढे धनशक्तीचे आवाहन उभे राहणार असल्याचा अदांज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे श्रीराम शेटेंची ‘निष्ठा’ धनशक्तीला पराभूत करुन साहेबांचा विश्वास सार्थकी ठरवणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.