चिंचखेड |वार्ताहर| Chinchkhed
सिंहस्थ (कुंभमेळा) निधीतून प्रस्तावित दिंडोरी–पालखेड–लोखंडेवाडी–जोपुळ–पिंपळगाव या मार्गाच्या रुंदीकरणासाठी भू-संपादन न करता काम सुरू करण्याच्या प्रयत्नाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम आहे. या संदर्भात अनेक बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती अधिकारात या रस्त्याचे दुतरफा 20 मीटर क्षेत्रातील घर शेड विहीर शेती अतिक्रमित ठरवित ते काढण्याच्या नोटीसा दिल्या तर एक माहिती अधिकार उत्तरात 30 ते 60 मीटर रस्ता होणार असल्याची माहिती दिली. मात्र, कोणतेही अधिकृत भू-संपादन न झाल्याने शेतकरी संतप्त आहेत. केवळ “राज्यमार्ग” दर्जा असल्याच्या निकषावर काम रेटून नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्या ८० दिवसांपासून शेतकरी कृती समितीचे साखळी उपोषण सुरू असून, आंदोलकांनी “भू-संपादनाशिवाय काम होऊ देणार नाही” अशी ठाम भूमिका घेतली आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी भू-संपादनाबाबत निर्णय होईपर्यंत काम थांबवण्याचे निर्देश दिले होते. तरीही पालखेड येथे ठेकेदाराने काम सुरू केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत काम बंद पाडले.
यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता व शाखा अभियंता यांना कळवूनही ते घटनास्थळी पोहोचले नाहीत, अशी तक्रार करण्यात आली आहे. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री गिरीश महाजन,खासदार भास्कर भगरे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत अनेक बैठका पार पडल्या, बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची भेट घेतली मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन देण्यात आले असले तरी ती बैठक अद्याप झालेली नाही. दरम्यान, भू-संपादन मोबदला देण्याबाबत अनेक मंत्री व अधिकारी सकारात्मक असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग शासनाच्या अध्यादेशावर ठाम राहून चुकीची माहिती देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
ग्रामीण रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा देऊन त्याचे रुंदीकरण करताना भू-संपादन प्रक्रियेचा समावेश करावा, तसेच योग्य मोबदला द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा बळजबरीने रस्ता होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
धडक मोर्चा जाहीर
भू-संपादन मोबदल्याच्या मागणीसाठी येत्या २७ मार्च रोजी नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर शेतकरी कृती समितीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.




