अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कामरगाव (ता. अहिल्यानगर) परिसरात हॉटेल रेणुका दही मिसाळच्या पार्किंगमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणार्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल 2 कोटी 1 लाख 9 हजार 628 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सोमवारी (23 मार्च) पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व त्यांच्या पथकातील अंमलदार लक्ष्मण खोकले, अतुल लोटके, बिरप्पा करमल, संतोष खैरे हे अवैध धंद्यांची माहिती काढत असताना त्यांना माहिती मिळाली की, अहिल्यानगर- पुणे मार्गालगत कामरगाव शिवारातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये तीन गॅस टँकरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरला जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. तेथे तीन एचपी गॅस टँकरमधून गॅस रिफिलिंग सुरू असल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळी चौघांना ताब्यात घेतले. सचिन आबा बोधले (वय 31, रा. दहिवडी, ता. तुळजापुर, जि. धाराशीव), माणिक बालाजी गुट्टे (वय 32, रा. दैठणे, ता. परळी, जि. बीड), उल्हास जीवन कवडे (वय 32, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशीव) आणि अमृत बाळासाहेब ठोकळ (वय 33, रा. कामरगाव) अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. कारवाईदरम्यान पोलिसांनी 30 लाख 48 हजार रूपये किमतीचा 57.200 टन गॅससह तीन एचपी गॅस टँकर, भारत गॅसचे भरलेले व रिकामे सिलेंडर, एक टेम्पो, तसेच गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 2 कोटी 1 लाख 9 हजार 628 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
धोकादायक रिफिलिंग
संशयित आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी कोणताही शासकीय परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे काम करत असल्याची कबुली दिली. संशयित आरोपी हे टॅकर मधून व्यावसायिक गॅस टाक्यात गॅस रिफिलिंग करताना आवश्यक ती सुरक्षितता न पाळता अत्यंत धोकादायक पध्दतीने रिफिलिंग करत होते. यामुळे स्वतःसह परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.





