Sunday, April 26, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबा पोलिसांच्या रडारवर

Shrirampur : श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबा पोलिसांच्या रडारवर

नागरिकांना सतर्कतेचे प्रशासनाकडून आवाहन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भोंदूगिरीच्या वाढत्या घटनांमुळे समाजात चिंता व्यक्त होत असताना, अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषा धूसर होत चाललेल्या काळात काही भोंदूबाबा लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेत आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण करत असल्याचे उघड होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक संशयित भोंदूबाबा आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

- Advertisement -

अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजातील सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. त्यांच्या श्रद्धेचा गैरवापर करून त्यांना भीती, अंधश्रद्धा आणि खोट्या आश्वासनांच्या जाळ्यात अडकवले जाते. काही प्रकरणांमध्ये आजार बरे करण्याचे, नोकरी लावण्याचे, वैवाहिक अडचणी सोडवण्याचे किंवा अपयश दूर करण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर आले आहे. याहून गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी महिलांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचारांच्या तक्रारीही पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही भोंदू बाबाच्या संशयास्पद हालचाली, फसवणुकीचे प्रकार किंवा गैरवर्तन आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.

नागरिकांनी भीती न बाळगता पुढे येऊन माहिती दिल्यास अशा प्रवृत्तींवर आळा घालणे शक्य होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या प्रवृत्तींचा निषेध करताना, नागरिकांनीही सजग राहून अशा भोंदूगिरीला बळी न पडणे महत्त्वाचे आहे. निपाणी वाडगामध्ये अशोक खरात येवून गेला असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तीने सुमारे 8 हजार स्केअर फुटाच्या बंगल्याचे बांधकाम त्याच्या हस्ते सुरु केले असून या व्यक्तीची श्रीरामपुरातही अनेक ठिकाणी प्लॉटच्या रुपाने संपती असल्याची चर्चा आहे. ही संपती या व्यक्तीकडे अचानक कशी आली याबाबतही निपाणी वाडगाव परिसरात खमंग चर्चा होत आहे.

भोंदूबाबा अशोक खरात याचे श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वाडगावसह काही गावांत कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जे कुणी या भोंदू बाबाच्या संपर्कात होते, त्यांच्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. या बाबाच्या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे सोपविण्यात आल्याने, श्रीरामपूर तालुक्यातील काही बड्या पुढार्‍यांना एसआयटीने चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याची माहीती आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik उपनगर पोलीस ठाणे (Upnagar Police Station) येथे तक्रार मागे घेण्याच्या वादातून एकाने विष प्राशन करून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याची धक्कादायक...