नविन नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी अचानक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेषतः येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या राजकीय वजनावर आणि शब्दावर अवलंबून असलेल्या इच्छुक उमेदवारांची मोठी कोंडी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवीन नाशकातून मनसेकडून तिकीट मिळेल, या अपेक्षेने तयारी करणारे अनेक इच्छुक आता संभ्रमात सापडले आहेत. दिनकर पाटील हे मनसे हर घर समदेशी घर घर स्वदेशी संघटनेतील महत्त्वाचे पदाधिकारी मानले जात होते. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि नेतृत्वाशी असलेली जवळीक यामुळे अनेक इच्छुक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहत होते. काही प्रभागांमध्ये उमेदवारीसाठी पाटील यांचा शब्द अंतिम मानला जात असल्याचीही चर्चा होती.
मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे हे सर्व गणित एका क्षणात बदलले. मनसेतून इच्छुक असलेल्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, आता आपले काय? असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांना पडला आहे. काहींनी आधीच प्रचाराची सुरुवात केली होती, तर काहींनी आर्थिक तयारीही करून ठेवली होती. पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इतर पर्यायांचा विचार न केलेल्या इच्छुकांची अवस्था अधिक बिकट झाली आहे. मनसेकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी झाली, तर भाजपमध्ये आधीच इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नव्याने प्रवेश करणाऱ्यांना संधी मिळेल का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
दुसरीकडे, भाजपमध्ये दिनकर पाटील यांच्या प्रवेशाकडे संघटन बळकटीकरण म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या संपर्कातील काही इच्छुक भाजपकडे वळतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, भाजपच्या अंतर्गत समीकरणांमध्ये नव्याने आलेल्या गटाला किती महत्त्व दिले जाईल, हे अद्याप स्पष्ट नाही. एकूणच, या राजकीय घडामोडीमुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवारांची गणिते कोलमडली आहे.
हे ही वाचा: Nashik News: पक्षप्रवेशाचा सामान्यांना फटका; वाहतुक कोंडीमुळे सीबीएस, शालिमार, गडकरी चौकातील वाहतूक काही काळ ठप्प
दिनकर पाटील मनसेतून निलंबन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांना पक्षातून निलंबित केले आहे. दरम्यान गुरुवारी (दि. २५) सकाळी पाटील यांनी भाजपत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, याबाबतचा अधिकृत पत्र प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, दिनकर पाटील यांच्याशी यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही संबंध राहणार नाही. पक्षाच्या धोरणांना आणि संघटनात्मक शिस्तीला बाधा पोहोचवणाऱ्या कृतींमुळे ही कठोर पावले उचलण्यात आल्याचे मनसेकडून सांगण्यात येते.
मनसे कार्यकर्त्यांचा जल्लोष
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी काल अचानक भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर मनसेत मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर सकाळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नेते शिरीष सावंत यांनी पाटील यांना पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून पक्षातून निलंबित केल्याचा अधिकृत आदेश काढला. या निलंबनाच्या निर्णयानंतर मनसे मुख्यालय असलेल्या नाशिकमधील राजगड कार्यालयाबाहेर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले. त्यांनी फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या हातात निलंबनाचे पत्र होते. पक्षनिष्ठा महत्वाची असा संदेश देत कार्यकर्त्यांनी नेतत्वाच्या निर्णयाचे स्वागत केले. पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेवर निलंबनाच्या कारवाईने पूर्णविराम मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. मनसेत शिस्त आणि एकनिष्ठतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, हे या कृतीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी रतनकुमार इचम, मनोज घोडके, संदीप गांगुर्डे, जावेद शेख, भाऊसाहेब निमसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




