अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मागील महिन्यांत जिल्हा परिषद प्रशासनाने दिव्यांग कर्मचार्यांची प्रमाणपत्रे तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवली होती. यातील 203 दिव्यांगांची तपासणी करून जिल्हा रूग्णालयाने नुकताच जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला. त्यात 18 कर्मचारी बोगस आढळल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या तपासणीला गैरहजर असणार्या 28 कर्मचारी यांच्यासह 18 बोगस प्रमाणपत्र असणार्या कर्मचार्यांना जिल्हा परिषद प्रशासाने नोटीस बजावली आहे. येत्या सात दिवसात या सर्वांना खुलासे सादर करण्याचे आदेश बजावण्यात आले आहे.
दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व दिव्यांग कर्मचार्यांची फेरतपासणी करण्याचे आदेश सप्टेंबर 2025 मध्ये काढले होते. अहिल्यानगर जिल्हा परिषदेलाही हा आदेश सप्टेंबरमध्ये मिळाला. त्यानंतर तालुकास्तरीय समिती स्थापन करून शिबिरे घेऊन दिव्यांग तपासणी करण्याचे ठरले. त्यानुसार 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ही शिबिरे झाली. त्यात 550 दिव्यांगांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. पैकी तीनशेजण दृश्यस्थितीत दिव्यांग दिसत असल्याने त्यांच्या केवळ कागदपत्रांची तपासणी करण्याचे ठरले, तर उर्वरित 250 जण डोळ्याने दिव्यांग दिसत नसल्याने त्यांची प्रत्यक्ष रूग्णालयात जाऊन फेरतपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तालुकानिहाय समित्याही हा अहवाल लवकर देईनात. अखेर महिनाभरानंतर म्हणजे 26 डिसेंबर 2025 रोजी या 250 कर्मचार्यांना रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यातील 90 अस्थिव्यंग व इतर काही कर्मचारी अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयात, तर 160 अल्पदृष्टी व कर्णबधिर कर्मचारी नाशिक येथील उपसंचालक कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत.
दरम्यान, नगर जिल्हा रूग्णालयाने तपासणी करून पाठवलेल्या अहवालात जिल्हा परिषदेतील शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, लेखा आणि चक्क सामान्य प्रशासन विभागातील दोन अशा 18 कर्मचार्यांची दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे. या सर्वांना आता ते कार्यरत असणार्या विभागाच्या प्रमुखांमार्फत नोटीसा धाडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच या तपासणीला गैरहजर असणार्या 28 कर्मचार्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
नगरचे दिव्यांग राज्यात चमकणार
राज्याच्या येणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत राज्यातील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील आमदारांनी नगर जिल्हा परिषदेतील बोगस अपंग यांच्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर काय कारवाई केली. तसेच नाशिक येथील उपसंचालक कार्यालयाने वेळेत संबंधित दिव्यांगाचे प्रमाणपत्र तपासणी करून दिले की नाही, याबाबत विचारणा केलेली आहे. यामुळे नगरच्या बोगस दिव्यांगाचा विषय येणार्या अर्थसंकल्पी अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत.
नाशिककडून तपासणी वेळापत्रकाची प्रतीक्षा
चार महिने झाले तरी केवळ 50 टक्केच दिव्यांग तपासणी झालेली आहे. नाशिक उपसंचालक कार्यालयाने अद्याप अहिल्यानगर जिल्हा परिषदेला दिव्यांग तपासणीचे वेळापत्रकच दिलेले नाही. त्यांना महिनाभरापासून जिल्हा परिषद वेळापत्रक मागत आहे. परंतु, ते दाद द्यायला तयार नाहीत. त्यामुळे नाशिकची तपासणी होऊन अहवाल येण्यास अजून किती कालावधी जाईल, हे जिल्हा परिषदेलाही सांगता येत नाही. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी गोंधळ झाल्याने नाशिककरांनी त्यांचे जिल्ह्यातील दिव्यांगांचे प्रमाणपत्र मुंबईला तपासण्यासाठी पाठवले होते. यामुळे नगरच्या प्रकरणात नाशिक उपसंचालक कार्यालय कशी तपासणी करणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.





