मुंबई | Mumbai
राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आल्यामुळे महायुतीमध्ये धुसफुसी सुरु असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांना समितीतून वगळल्याची चर्चा होताच राज्य सरकारने या निर्णयात बदल केला असून एकनाथ शिंदे यांचा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये समावेश करण्यासाठी नियमात बदल केला जाणार आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियमात बदल केले जाणार आहेत. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर उपाध्यक्ष दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, असा मोठा बदल करण्यात आला आहे. २०१९ च्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री आणि काही ठराविक मंत्री असतील, असा नियम होता. त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.
जुलै २००५ साली मुंबईत पुराने थैमान घातले होते. त्यावेळेस या समितीची स्थापना करण्यात आली होती. आपातकालीन परिस्थितीत ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते. राज्याचा मुख्यमंत्री या समितीचा अध्यक्ष असतो. त्यानुसार आता या समितीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस हे आहेत. नव्या समितीमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह महसूल, मदत व पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. परंतु, एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये स्थान मिळाले नव्हते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावरुन महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. एकंदरीतच महायुतीत कोणत्याही प्रकारची वितुष्टता येऊ नये म्हणून आता नियमात बदल करून एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये सहभागी करुन घेण्याचा निर्णय झाला आहे.
एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजची मंत्रिमंडळाची बैठक आटोपल्यानंतर दिल्लीला जाणार आहेत. पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे. दिल्लीत सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र सदनात हा गौरव पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त अजित पवार यांनी मंत्रालयात पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा