शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon
निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. एका महिलेच्या तक्रारीवरून लैंगिक शोषण तसेच जादूटोणा विरोधी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर सुमारे २४ तासांनी, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला निफाड येथील प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती एस.एस. सुक्रे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी अभियोक्ता अॅड. मनोज तोरणे यांनी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला (दि.२९) एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली.
दरम्यान, आरोपी महेश काकडे याचा धारणगाव खडक येथे मठ असून दर गुरुवारी तेथे दरबार भरत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शयता व्यक्त केली जात आहे. लासलगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
या प्रकरणात आणखी काही महिलांची फसवणूक किंवा लैंगिक शोषण झाले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीस कोठडीदरम्यान आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सदर भोंदू बाबाकडून कोणाचीही फसवणूक, आर्थिक गंडा किंवा छळ झाला असल्यास त्यांनी कोणतीही भीती न बाळगता लासलगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी.
दिपक पाटील सहा.पोलिस निरीक्षक





