Friday, September 20, 2024
Homeनगरधो-धो पाऊस, निळवंडेतून विसर्ग आणखी वाढणार

धो-धो पाऊस, निळवंडेतून विसर्ग आणखी वाढणार

भंडारदरातून 21854 क्युसेकने विसर्ग, मुळा आज 75 टक्के होणार

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

पाणलोटात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी आषाढ सरींनी अंतिम चरणात जोरदार तांडव सुरू केल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक प्रचंड वाढत आहे. त्यामुळे भंडारदारातून तासागणिक विसर्ग वाढविण्यात येत आहे. हे पाणी निळवंडेत जमा होत असल्याने 8330 दलघफू क्षमतेच्या निळवंडेतून पाणीसाठा नियंत्रणासाठी प्रवरा नदीत पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. रात्रीतून हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. आणि 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा आज 75 टक्क्यांच्या पुढे जाणार आहे.

पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने भंडारदरात नव्याने पाण्याची जोमाने वाढ होत आहे. परिणामी 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा 10626 दलघफू (96टक्के) कायम ठेऊन काल शनिवारी रात्री 10 वाजता विसर्ग 21854 क्युसेकने प्रवरा नदीत सोडण्यात येत होते. तसेच वाकी धरणातून 4000 क्युसेकने विसर्ग सुरू होता तसेच इतर ओढ्या-नाल्याचे पाणी येत असल्याने निळवंडेत सुमारे 28000 क्युसेकने आवक सुरू होती. त्यामुळे निळवंडे धरणातील साठा क्षणाक्षणाला वाढत आहे. धो-धो पाऊस कोसळत असल्याने पाण्याची आवक होत आहे. पाऊस आणि पाण्याची जोमाने होणारी आवक पहाता रात्री 8 वाजल्यापासून निळवंडे धरणातून 800 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते.रात्रीतून हा विसर्ग आणखी वाढविण्याची शक्यता होती.

काल दिवसभरात भंडारदरात झालेल्या पावसाची नोंद 65 मिमी झाली आहे. काल सकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने 319 दलघफू पाणी आले. 187 दलघफू पाणी वापरले गेले. तर 132 दलघफू पाणी साठ्यात जमा झाले. गत 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस मिमी.असा- भंडारदरा- 102, घाटघर 110, रतनवाडी 115, पांजरे 105. दरम्यान, 1060 दलघफू क्षमतेचे आढळा धरणही भरले असून विसर्ग सुरू आहे. हरिश्चंद्रगड, पाचनई, आंबितमध्ये पावसाचा जोर आणखी वाढल्याने मुळा नदीतील विसर्ग काल दिवसभर वाढत होता. काल सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग सकाळी 6 वाजता 10342 क्युसेक, सकाळी 9 वाजता तो 10738 क्युसेक होता. त्यानंतर पावसाचा जोर आणखी वाढल्याने सायंकाळी नदीचा विसर्ग 14806 क्युसेक होता. पाण्याची आवक जोमाने होत असल्याने 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 18048 दलघफू (70 टक्के) झाला होता. आज या धरणातील पाणीसाठाही 75 टक्क्यांच्या पुढे जाणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.

डिंभे 90 टक्के भरले
दक्षिण नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कुकडी प्रकल्पाच्या समूह धरणांमध्ये पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणांत नव्याने 1187 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा काल सकाळी 16836 दलघफू (57 टक्के) झाला आहे. गतवर्षी याच काळात 62 टक्के पाणीसाठा होता. 13500 दलघफू क्षमतेच्या डिंभे धरणातील पाणीसाठा 10809 दलघफू (90 टक्के) झाला आहे. पिंपळगाव जोगे धरणातील पाणीसाठा प्लसमध्ये येणार आहे. घोड धरणातील पाणीसाठा 70 टक्क्यांवर पोहचला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या