Sunday, May 5, 2024
Homeनगरचांद्याच्या ऑफलाईन ग्रामसभेत विविध ठरावांवर चर्चा

चांद्याच्या ऑफलाईन ग्रामसभेत विविध ठरावांवर चर्चा

चांदा |वार्ताहर| Chanda

तब्बल दोन वर्षानंतर नेवासा तालुक्यातील चांदा ग्रामपंचायतीची ऑफलाइन ग्रामसभा शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शासनाने घोषित केलेल्या घरकुल निधीची रक्कम वाढवावी, राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा गावात सुरू कराव्यात आदी विविध विषयांवर ग्रामसभेत सखोल चर्चा करून विविध विषयांवरील ठराव समंत करण्यात आले.

- Advertisement -

कोवीड 19मुळे तब्बल दोन वर्षापासून चांदा ग्रामपंचायतीची ग्रामसभा ऑफलाइन पद्धतीने झाली नव्हती.यापूर्वी ऑनलाईन ग्रामसभा झाली होती. शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ऑफलाईन ग्रामसभा सरपंच ज्योती जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन अनेक ठराव संमत करण्यात आले. सध्या शासनाकडून घरकुल योजनेसाठी मिळत असलेला निधी हा अतिशय तुटपुंजा असून वाढत्या महागाईमुळे लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करणे शक्य होत नाही.त्यामुळे शासनाने घरकुलाची अनुदान रक्कम वाढवून तीन लाख करावी. हा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.

येथील राष्ट्रीयीकृत बँकेत ग्राहकांची वारंवार अडवणूक होत असल्याबद्दल अनेकांनी ग्रामसभेत तक्रारी व्यक्त केल्या. त्यामुळे या राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा चांद्या मध्ये सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव करण्यात यावा अशी मागणी वक्त्यांनी केली. वीज मंडळाकडे भरण्यात आलेल्या थकबाकीतून ग्रामपंचायतीला निधी मिळावा. स्वस्त धान्य दुकानांमध्ये वितरण व्यवस्थेत सुसुत्रता असावी. वाडीवस्तीवर अक्षय प्रकाश सुरू करणे. दशक्रियाविधी ओटा बांधणे, जुनी मोडकळीस आलेली पाण्याची टाकी पाडणे. गावात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, नदीपात्र सुशोभिकरण, निराधार वृद्धांना अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करणे आदी ठराव संमत करण्यात आले.

चांदा नदी सुशोभीकरणासाठी तसेच पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा यासाठी आमदार शंकरराव गडाख व माजी सभापती सुनीताताई गडाख यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. त्याचबरोबर चांदा बाजार तळावरील शिवछत्रपती पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा परिषदेचे सभापती सुनिल गडाख यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचाही अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

ग्रामसभेत मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे, नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे, एन. टी. शिंदे, भाजपाचे कैलास दहातोंडे, रशिद इनामदार, प्रकाश बोरुडे, सतीश गाढवे, किरण जावळे, बाळासाहेब दहातोंडे, बाबासाहेब दहातोंडे, कार्तिक पासलकर, अशोक गाढवे, संतोष गाढवे, देविदास पासलकर आदींनी चर्चेत भाग घेतला.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अनिलराव अडसुरे, मुळा कारखान्याचे संचालक बाबुराव चौधरी, उपसरपंच चांगदेव दहातोंडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष मोहनराव भगत, माजी सरपंच संजय भगत, नाथा जावळे ,अरुण बाजारे, अरुण दहातोंडे, गोविंद जावळे दीपक जावळे, पोपट दहातोंडे, अ‍ॅड. समीर शेख, सादिक शेख,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रजनीकांत पुंड, डॉ. सुधीर पुंड, तलाठी श्री. वाडेकर, मुख्याध्यापिका श्रीमती गारुडकर यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन ग्रामविकास अधिकारी रजनीकांत मोटे यांनी केले तर आभार उपसरपंच चांगदेव दहातोंडे यांनी मानले.

तीनही देवस्थानांबद्दल ठराव

चांदा येथील खंडोबा देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी देवस्थान मालकीची जमिन ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी. देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात यावे. गावातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरासाठी असलेली जमीन ग्रामपंचायतीने ताब्यात घेऊन देवस्थान विकासासाठी वापर करावा. तसेच गावच्या चाँदखावली बाबाच्या गढीवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, अशा गावातील तीनही जागृत देवस्थानांबद्दल ग्रामसभेत चर्चा होऊन ठराव करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या