राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन लोखंडी रॉड, फायटर आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच डोळ्यात मिरची पूड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे घडली.
19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास रोहित दत्तात्रय ढोकणे, त्यांचे वडील व चुलते आरोपी गणेश तांबे याला रस्त्यावर लावलेली गाडी बाजूला घेण्यास सांगण्यासाठी गेले होते. यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून रोहित ढोकणे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर इतर आरोपींनी मिळून ढोकणे कुटुंबियांना लोखंडी रॉड, फायटर व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.
यामध्ये रोहित ढोकणे, दत्तात्रय ढोकणे, संतोष ढोकणे आणि महेश ढोकणे हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. रोहित दत्तात्रय ढोकणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गणेश काशिनाथ तांबे, देविदास भास्कर तांबे, जयदीप देविदास तांबे, पवन देविदास तांबे, सोमनाथ काशिनाथ तांबे, ऋतिक सोमनाथ तांबे, लाल्या सोमनाथ तांबे, स्वाती गणेश तांबे या 8 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109, 118 (1), 115 (2), 352, 351 (2), 189 (1), 191 (1), 191 (3) आणि 190 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करत आहे.





