अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरील केडगाव शिवारात हॉटेल आण्णा तंदुरी धाब्याच्या पाठीमागे जुन्या वादाच्या रागातून एका तरूणावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. आकाश सोनबा धोत्रे (वय 26, रा. अंबिकानगर, केडगाव) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋतिक भास्कर धोत्रे व रोहित भास्कर धोत्रे (दोघे रा. वडार गल्ली, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. फिर्यादी आकाश धोत्रे हे 20 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी हॉटेलच्या पाठीमागे गेले असता तेथे संशयित आरोपी रोहित धोत्रे व ऋतिक धोत्रे यांनी संगनमत करून त्यांच्यावर हल्ला केला. मागील भांडणाचा राग मनात धरून संशयित आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ केली.
यावेळी रोहित धोत्रे याने फिर्यादीला कानाखाली मारहाण केली. मला का मारले? असे विचारताच आरोपी अधिकच चिडले. त्यानंतर रोहित याने फिर्यादीचे हात पकडले असताना ऋतिक याने हातातील चाकूने फिर्यादीच्या पोटाजवळ बरगडीवर वार करून जखमी केले. जखमी फिर्यादीस उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर आकाश यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात 23 डिसेंबर रोजी फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार गाजरे अधिक तपास करीत आहेत.




