Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन व रामतीर्थ गोदा प्राच्यविद्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण

रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन व रामतीर्थ गोदा प्राच्यविद्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने श्री गोदा जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार’ व ‘रामतीर्थ गोदा प्राच्यविद्या राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण सोहळा गोदा घाट येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या वेळी ‘रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार’ ज्येष्ठ कृषी विचारवंत पद्मश्री सुभाष शर्मा यांना प्रदान करण्यात आला. भारतीय कृषी क्षेत्रात स्वदेशी, सेंद्रिय व आत्मनिर्भर शेतीचा विचार रुजविण्यासाठी त्यांनी केलेले योगदान अतुलनीय असल्याचे यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले.

तसेच ‘रामतीर्थ गोदा प्राच्यविद्या राष्ट्रीय पुरस्कार ‘वेदशास्त्रनिष्ठ अभ्यासक पं. राजेश्वरशास्त्री भालचंद्रशास्त्री जोशी यांना प्रदान करण्यात आला. भारतीय वैदिक परंपरा, वेद, दर्शन, स्मृती व लोकपरंपरेच्या संवर्धनासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य अर्पण केल्याबद्दल त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ‘रामतीर्थ गोदावरी सेवा समिती’चे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री . गजेंद्रसिंह शेखावत उपस्थित होते.मुख्य वक्त्या म्हणून राष्ट्रीय सेविका समितीच्या प्रमुख संचालिका वंदनीय शांताकुमारी यांनी मार्गदर्शन केले.
तर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या उपस्थित होत्या.

कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष वेद. म. शांतारामशास्त्री भानसे, उपाध्यक्ष नृसिंहकृपा दास, सचिव मुकुंद खोचे, कोषाध्यक्ष अर्शिया केला यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्वान, साधक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गोदामातेची ११११ मातृशक्तींकडून करण्यात आलेली ‘श्री गोदा महाआरती’ होय. श्रद्धा, समरसता व सांस्कृतिक ऐक्याचे दर्शन घडविणारा हा सोहळा नाशिकच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा गौरव करणारा ठरला.

यावेळी प्रमुख अतिथी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आपल्या मनोगतात ११११ मातृशक्तींना वंदन करताना हे प्रतीक राजमाता अहिल्याबाई होळकर, महाराणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्य व मातृशक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले. त्यांनी आयोजकांचे अभिनंदन करताना नाशिक हे सौभाग्यशाली शहर असून प्रभू श्रीरामांच्या चरणस्पर्शाने येथील भूमी व गोदा घाट मंत्रोच्चारांनी पावन झाल्याचे मत व्यक्त केले.

भारत हा बहुआयामी संस्कृतीचा देश असून विविध वेशभूषा, भाषा, खाद्यसंस्कृती व परंपरा हीच आपली ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने या विविधतेचे दर्शन नाशिककरांना घडणार असून, गोदावरी नदीची स्वच्छता, नितळता व संवर्धनाची जबाबदारी पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प नागरिकांनी करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...