नाशिक | प्रतिनिधी | Nashik
येवला तालुक्यातील (Yeola Taluka) एका नियोजित पेट्रोल पंपाच्या मंजुरीसाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची (Nashik Collector) बनावट स्वाक्षरी, कार्यालयाचा गोल शिक्का आणि बोगस जावक क्रमांकाचा वापर करून महसूल विभाग व पेट्रोलियम कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याऐवजी आयुष प्रसाद यांच्या नावाचा वापर करत हा बनावट दाखला बनवण्यात आला होता. सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्यात एक व्यक्ती नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आली होती. त्याने स्वतःकडील एका पत्राची प्रत दाखवून अशाच प्रकारच्या अधिकृत दाखल्याची मागणी केली. या पत्राची महसूल विभागाच्या (Revenue Department) कर्मचाऱ्यांनी छाननी केली असता, त्यावर नमूद असलेला जावक क्रमांक नोंदवहीत आढळला नाही. पडताळणी केली असता, हे पत्र हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रादेशिक कार्यालयाला २२ जुलै २०२६ रोजी पाठवण्यात आल्याचे दर्शवण्यात आले होते. यामध्ये येवला तालुक्यातील एस. एन. डी. इंजिनिअरिंग कॉलेज ते राज्य महामार्ग २५ वरील पाटोदा बस स्टॉपदरम्यान पेट्रोल पंपासाठी पर्यायी जागा उपलब्ध नाही, असा दाखला देण्यात आला होता.
यात, २२ जुलै २०२६ रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा असताना पत्रावर मात्र आयुष प्रसाद यांचे नाव लिहून त्यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली होती. महसूल विभागाच्या अधिकृत पत्रव्यवहारासाठी जिल्हाधिकारी असा शिक्का वापरला जातो. मात्र, दिशाभूल करण्यासाठी या पत्रावर जिल्हादंडाधिकारी नाशिक, असा खोटा गोल शिक्का मारण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील मूळ जावक नोंदवही तपासली असता एचपीसीएल कंपनीला असा कोणताही दाखला किंवा पत्र पाठवण्यात आले नसल्याचे निष्पन्न झाले.
एचपीसीएलला सतर्कतेचा इशारा
हा गंभीर प्रकार निदर्शनास येताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित दाखला पूर्णपणे बोगस व बेकायदेशीर असून शासकीय कामकाजासाठी किंवा पेट्रोल पंप मंजुरीसाठी तो ग्राह्य धरू नये, असे स्पष्ट पत्र एचपीसीएल प्रशासनाला पाठवण्यात आले आहे. महसूल सहायक विक्रम बदादे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणूक करणे, बनावट दस्तऐवज तयार करणे, मौल्यवान कागदपत्रांचे बनावटीकरण करणे आणि बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




