Friday, May 3, 2024
HomeनगरVideo : जिल्ह्यातील बाजार समिती 31 मेपर्यंत बंद

Video : जिल्ह्यातील बाजार समिती 31 मेपर्यंत बंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात करोनाला रोखण्यात काही प्रमाणात प्रशासनाला यश आले असले तरी ग्रामीण भागात करोनाचा प्रसार वाढत आहे. नगर शहरातील बाजार समिती बंद केल्यानंतर त्याचे चांगले परिणाम समोर आल्याने ग्रामीण भागातील करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या 31 मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात मंगळवार (दि.18) पासून रात्री 12 पासून हा आदेश लागू होणार असून 31 मेच्या रात्री 12 पर्यंत लागू राहणार आहे. जिल्ह्यात सध्या दैनदिन करोना रुग्णांची संख्या 2 हजार ते 2 हजार 100 असल्याचे समोर येत आहे. तर उपचार सुरू असणार्‍यांची संख्याही 22 हजारांच्या घरात आहे. दरम्यान, नगरची कृषी बाजार समितीचे कामकाज बंद केल्यानंतर नगर शहरातील करोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात असल्याचे दिसून आले. यामुळे जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे कामकाज 31 मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी व्यापारी आणि शेतकर्‍यांना याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आवाहन केले असून आज (मंगळवारी) दिवसभरात व्यापारी आणि शेतकरी त्यांच्या शेतमालाचे नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. यामुळे आता उद्या बुधवारपासून जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार असल्याने नागरिकांना ताज्या भाजीपाल्यासह फळांना मुकावे लागणार आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या