अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येत्या 2 डिसेंबर रोजी होणार्या जिल्ह्यातील 12 नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील महिला मतदारांची निर्णायक ताकद यंदा विशेषत्वाने जाणवत आहे. जिल्ह्यातील 12 नगरपालिकांपैकी सात ठिकाणी महिलांची मतदारसंख्या पुरूषांपेक्षा जास्त असल्याने, ‘मातृशक्तीचे मत’ कोणाकडे झुकतंय यावरच निकालांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
12 नगरपालिकांसाठी यंदा 4 लाख 51 हजार 284 नागरिक मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यात 2 लाख 27 हजार 628 महिला तर, 2 लाख 23 हजार 586 पुरूष मतदार आहेत. महिला मतदार पुरूषांपेक्षा 4 हजार 42 ने अधिक आहेत. निवडणुकीपूर्वी महिलांकडे झुकलेला हा आकडा राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता बाळगतो. विशेषत: गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘लाडक्या बहिणीं’नी महायुतीला दिलेली मोठी आघाडी अद्याप राजकीय स्मरणातून गेलेली नाही. त्यामुळे सर्व पक्ष महिलांच्या समर्थनासाठी धडपडताना दिसत आहेत.
जिल्ह्यातील अनेक पालिकांत महिला आघाडीचा कल असून, श्रीरामपूर नगरपरिषदेत सर्वाधिक 2 हजार 464 महिला पुरूष मतदारापेक्षा जास्त आहेत. कोपरगावात 1 हजार 179, संगमनेरात 934, नेवाशात 128, राहुरीत 92, शेवगावात 33, तर शिर्डीत 24 महिलांची आघाडी आहे. या सर्व ठिकाणी महिला मतदारांचे प्रश्न, त्यांचे कल, आर्थिक-सामाजिक प्राधान्ये आणि स्थानिक नेतृत्वावरचे विश्वासाचे समीकरण निर्णायक ठरणार आहे. राहाता, पाथर्डी, श्रीगोंदा, देवळाली आणि जामखेड येथे पुरूषांची संख्या किंचित जास्त असली तरी फरक अल्प आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्वस्वी स्थानिक प्रश्नांवर लढल्या जातात. यामध्ये स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, सुरक्षेचे प्रश्न, वीज आणि स्थानिक सुविधा हे सर्व विषय महिलांच्या दैनंदिन जगण्याशी थेट जोडलेले असल्याने महिलेचा निर्णय अधिक संवेदनशील आणि परिणामकारक ठरतो. महिलांचा निर्णायक कल कोणाकडे झुकतो, यावरच निकाल अवलंबून असेल इतके मात्र नक्की.
पालिकानिहाय स्त्री-पुरूष मतदारसंख्या
देवळाली प्रवरा- पुरूष (12,027) स्त्री (11,830), जामखेड- (16,749) (16,412), कोपरगाव- (31,135) (32,314), नेवासा- (9,292) (9,420), पाथर्डी- (11,633) (11,609), राहाता- (9,766) (9,698), राहुरी- (16,589) (16,681), संगमनेर (28,390) (29,324), शेवगाव- (17,721) (17,754), शिर्डी- (16,792) (16,816), श्रीगोंदा- (14,256) (14,070), श्रीरामपूर- (39,236) (41,700)





